तीक्ष्ण हत्याराचे २५ वार
संपूर्ण शरीरावर २५ वार करून, हाताचे दोनही अंगठे कापून तरुणीचा निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. शिवाजी पुलापासून पाटील महाराज समाधीकडे जाणाऱ्या गायरान जागेत तरुणीचा मृतदेह मिळून आला. पहाटे चार ते सहाच्या दरम्यान खून झाल्याचा अंदाज करवीर पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सामाजिक कार्यकत्रे उदय िनबाळकर सकाळी साडेसातच्या सुमारास पंचगंगा नदीमध्ये पोहण्यास गेले होते. पंचगंगा घाटवरून ते पोहून नदीच्या पलीकडे गेले असता त्यांना गायरान भागात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीचा मृतदेह दिसला. त्यांची याची माहिती पोलिसांना दिली. काही वेळातच करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप जाधव घटनास्थळी दाखल झाले. त्यांना गुलाबी रंगाचा टी शर्ट आणि निळ्या रंगाच्या लेगीनमध्ये तरुणीचा मृतदेह दिसून आला. करवीर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तिचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये आणला.
सर्वागावर पंचवीस वार
अंदाजे वीस ते पंचवीस वयोगटातील तरुणीच्या मानेवर ३, पोटावर ४, पाठीवर वर्मी ३ तर अकरा ठिकाणी भोसकण्यात आले आहे. अत्यंत क्रूरपणे करण्यात आलेल्या वर्मी घावांमुळे झालेल्या अतिरक्तस्राव होऊन तरुणी जागीच मृत झाली. हल्लेखोर आणि मृत तरुणी यांच्यात झटापट झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हल्ला करताना सुरा अडविण्याचा प्रयत्न त्या तरुणीने केला आहे. तिच्या दोन्ही हाताचे अंगठे तुटले आहेत. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्नात तिच्या हातावरही तीन ते चार वार झाल्याचे दिसून येते. मृतदेहापासून पंधरा फुटांच्या अंतरावर लाकडी मूठ असलेला धारदार सुरा मिळून आला. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळापासून दक्षिणेला सुमारे शंभर फुटांपर्यंत श्वानाने मार्ग काढून ते घुटमळले.
दुसरा खून
शिवाजी पुलाच्या बाजूला असणारी गायरान जागा सध्या दारू पिण्याऱ्यांचा ओपन बार बनली आहे. घटनास्थळी दारू, बिअर आणि पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडला आहे. याआधी याच परिसरात सेंट्रिंग कामगाराचा खून करण्यात आला होता. नदीपात्रातील गवताचा हा परिसर अवैध धंद्यांचा अड्डा बनला आहे.