गट ड

गतउपविजेत्यांना तुलनेने सोपा गट मिळाला आहे. ड – गटात त्यांच्यासमोर क्रोएशिया, नायजेरिया आणि पदार्पणाची स्पर्धा खेळणाऱ्या आइसलँडचे आव्हान असणार आहे. अखेरचा विश्वचषक खेळणाऱ्या लिओनेल मेसीला विजयी भेट देण्याच्या दिशेने उचललेले गट साखळी हे अर्जेटिनाचे पहिले पाऊल असणार आहे. गटात खडतर आव्हान नसले तरी येथील कामगिरी त्यांना पुढील वाटचालीचा आलेख उंचावण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या गटात दुसऱ्या स्थानासाठी क्रोएशिया आणि नायजेरिया यांच्यात कडवी चुरस अनुभवायला मिळणार आहे.

सेर्गियो रामेरो, एंजल डी मारिया, सेर्गियो अ‍ॅग्युरो, गोंझालो हिग्वेन, लुकास बिग्लीया आणि एव्हर बेनेगा या वरिष्ठ खेळाडूंचा हा अखेरचा विश्वचषक आहे. त्याशिवाय लिओनेल मेसीला जेतेपद पटकावून त्याच्या मागे लागलेला उपविजेतेपदाचा शाप हटवायचा आहे. त्यामुळे अर्जेटिनाचा संपूर्ण संघ मोठय़ा ताकदीने मैदानात उतरणार आहे. गतवर्षी आणि १९९०च्या उपविजेतेपदाच्या जखमा त्यांना अजूनही वेदना देत आहेत आणि १९८६नंतर पुन्हा जेतेपद पटकावून त्या जखमा भरून काढण्याचा त्यांचा निर्धार आहे.

अर्जेटिना

  • जागतिक क्रमवारी : ५
  • पात्र : पात्रता फेरीत अर्जेटिनाला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. अखेरच्या लढतीत त्यांनी इक्वेडोरला ३-१ असे नमवून अखेरच्या क्षणी विश्वचषक पात्रता निश्चित केली.
  • प्रशिक्षक : जॉर्ज सॅम्पोली
  • २०१४च्या विश्वचषक स्पर्धे तील कामगिरी : अंतिम फेरीत जर्मनीकडून १-० असे पराभूत
  • संभाव्य व्यूहरचना : ४-२-३-१

 

क्रोएशिया

रेयाल माद्रिद, बार्सिलोना, इंटरनॅशनल आणि युव्हेंट्स आदी क्लबमधून मुख्य भूमिका साकारणारे बरेच खेळाडू क्रोएशियाचे आहेत. लुका मॉड्रिक, इव्हान रॅकिटिक, इव्हान पेसिसिक, मारिया मॅनड्झुकीस आणि मार्सेलो ब्रोझोव्हिक हे प्रतिभावान खेळाडू आहेत आणि यांना क्रोएशियाची ‘सोनेरी पिढी’ (गोल्डन जनरेशन) असेही संबोधले जाते. मात्र मॉड्रिकसह (३२ वष्रे) संघातील अनेक खेळाडू तिशीच्या उंबरठय़ावर आहेत आणि त्यांच्याकडून धक्कादायक निकाल अपेक्षित नाही. १९९८च्या विश्वचषक स्पर्धेतील कांस्यपदक ही क्रोएशियाची आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यांची बचावफळीची कामगिरी चांगली आहे आणि संघांची संपूर्ण मदार मधळ्या फळीवर आहे. आक्रमणात हा संघ कमी पडतो.

  • जागतिक क्रमवारी : १८
  • पात्र : ग्रीसविरुद्धच्या बाद फेरीच्या लढतीत विजय. युरोपियन पात्रता गटात आईसलँडपाठोपाठ दुसरे स्थान.
  • प्रशिक्षक : झॅलट्को डॅलीस
  • २०१४च्या विश्वचषकातील कामगिरी : गट साखळीत पराभूत
  • संभाव्य व्यूहरचना : ४-२-३-१

 

नायजेरिया

संपूर्णपणे प्रतिहल्ल्याचा खेळ करणारा हा संघ प्रतिस्पध्र्यासाठी काळरात्र ठरू शकतो. २०१७च्या मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय सामन्यात याच संघाने अर्जेटिनासारख्या बलाढय़ संघाला नमवले होते. त्यामुळे या गटात अर्जेटिनापाठोपाठ त्यांचे पारडे जड मानले जात आहे. ब्राझीलमध्ये त्यांनी गतविजेत्या जर्मनीला विजयासाठी कडवा संघर्ष करण्यास भाग पाडले होते. व्हिक्टर मोजेस, अ‍ॅलेक्स इवोबी, केलेची आयहीनाचो यांचा समावेश असलेल्या अनुभवी आणि युवा फळीवर संघाची मदार असेल.

  • जागतिक क्रमवारी : ४७
  • पात्र : झाम्बिया, कॅमेरून आणि अल्जेरिया यांच्या गटात अव्वल स्थान
  • प्रशिक्षक : गेर्नोट रोहर
  • २०१४च्या विश्वचषकातील कामगिरी : उपउपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सकडून पराभूत
  • संभाव्य व्यूहरचना : ४-३-३

 

आइसलँड

विश्वचषक स्पर्धेत पात्र ठरलेला हा जगातील सर्वात लहान देश आहे. त्यांची लोकसंख्या जवळपास तीन लाख ३५ हजार एवढी आहे. आइसलँडला कमी लेखण्याची चूक इंग्लंडला युरो-२०१६ स्पर्धे त भोवली होती. त्यामुळे अन्य संघांसाठी हा संघ आव्हानात्मक ठरू शकेल. उंच, तंदुरुस्त आणि चपळ ही त्यांच्या खेळाडूंची वैशिष्टय़े. मात्र पुरेसा अनुभव गाठीशी नसल्याने त्यांची बाजू कुठे तरी कमकुवत ठरते. त्यात समोर असलेली आव्हाने पाहता या संघांला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार हे निश्चित.

  • जागतिक क्रमवारी : २२
  • पात्र : क्रोएशिया, युक्रेन आणि टर्की यांचा समावेश असलेल्या गटात अव्वल स्थान
  • प्रशिक्षक : हैमिर हॅलग्रिमसन
  • २०१४च्या विश्वचषकातील कामगिरी : पात्र ठरण्यास अपयशी
  • संभाव्य व्यूहरचना : ४-२-३-१

 

विश्वचषकाची रणमैदाने : सेंट पिट्सबर्ग स्टेडियम, सेंट पिट्सबर्ग

विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने हे रशियातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे स्टेडियम आहे. हे स्टेडियम क्रेस्टोव्हस्की बेटावरील प्रदेशात असल्यामुळे त्याला क्रेस्टोव्हस्की स्टेडियम असेही नाव आहे. विश्वचषकासाठीच हे स्टेडियम बांधण्यात आले आहे. या स्टेडियमचे बांधकाम २००८ मध्येच पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र अनेक वेळा त्याच्या स्वरूपात बदल होत गेल्यामुळे त्याच्या  पूर्णत्वास खूप वेळ लागला. अखेर गतवर्षी या स्टेडियमचे बांधकाम शंभर टक्के पूर्ण झाले व त्याचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. झेनित सेंट पिट्सबर्ग फुटबॉल क्लबचे हे घरचे मैदान असून गतवर्षी तेथे कॉन्फेडरेशन चषक स्पर्धेचे सामनेही घेण्यात आले होते.

  • आसन क्षमता : ६७ हजार
  • सामने : मोरोक्को वि. इराण, रशिया वि. इजिप्त, ब्राझील वि. कोस्टा रिका, नायजेरिया वि. अर्जेटिना. त्याचप्रमाणे उपउपांत्यपूर्व, उपांत्य फेरी व तिसऱ्या क्रमांकाची लढत.

संकलन : मिलिंद ढमढेरे, स्वदेश घाणेकर