पाकिस्तानचा दिग्गज आणि माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी वयाच्या ४१व्या वर्षीही क्रिकेट खेळणार आहे. त्याने जगभरातील टी-२० लीग आणि टी-१० लीगमध्ये आपली उत्तम कामगिरी दर्शवली आहे. आता तो नेपाळची स्थानिक टी-२० स्पर्धा एव्हरेस्ट प्रीमियर लीगमध्ये मोठे फटके मारताना दिसणार आहे. आफ्रिदी काठमांडू किंग्ज इलेव्हनकडून खेळेल. नेपाळचा स्टार खेळाडू संदीप लामिछानेही या संघात आहे. लामिछाने आयपीएलसह जगभरातील लीगमध्येही प्रवेश केला आहे.

संदीप लामिछानेने व्हिडिओ संदेश देऊन शाहिद आफ्रिदीचे स्वागत केले. लामिछाने म्हणाला, ”काठमांडू किंग्ज इलेव्हनमध्ये आपले स्वागत आहे. तुम्हाला मैदानावर खेळताना पाहण्यासाठी सर्व खेळाडू उत्सुक आहेत. माझा असा विश्वास आहे, की नेपाळ दौर्‍यावरील स्पर्धेदरम्यान तुमचा चांगला वेळ चांगला जाईल.” शाहिद आफ्रिदी आणि संदीप लामिछाने यापूर्वी पाकिस्तान सुपर लीग आणि अफगाणिस्तान प्रीमियर लीगमध्ये एकत्र खेळले आहेत.

 

हेही वाचा – ‘‘…तर विराटलाही संघाबाहेर करावं”, महाराष्ट्राचा जलतरणपटू वीरधवल खाडे संतापला

आफ्रिदीची प्रतिक्रिया आणि कारकीर्द

आफ्रिदी म्हणाला, ”काठमांडूची ही माझी पहिली भेट असेल. मी खूप उत्साही आहे.” आफ्रिदीने टी-२० क्रिकेटमधील ३२६ सामन्यात ४३९५ धावा केल्या आहेत. त्याने एक शतक आणि १० अर्धशतके झळकावली आहेत. यात त्याने २५२ षटकारही ठोकले आहेत. गोलंदाज म्हणून त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ३४४ बळी घेतले आहेत. ७ धावांत पाच बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने ११ वेळा ४ किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत.