१९९६च्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील काटेरी टक्कर चाहत्यांच्या मनात अद्याप ताजी आहे. व्यंकटेश प्रसाद आणि आमिर सोहेल यांच्यातील वादामुळे हा सामना चर्चेत आला होता. या सामन्यादरम्यान फलंदाज आमिर सोहेल वारंवार भारतीय गोलंदाज वेंकटेश प्रसादला भडकवण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्यावर कडक टीका झाली होती. गेल्या वर्षी एका यूट्यूब वाहिनीवरील मुलाखतीत व्यंकटेश प्रसादने या घटनेबाबत आपले मत दिले होते. आता आमिर सोहेलने या विषयावर आपले स्पष्टीकरण दिले आहे.

या सामन्यात रवी शास्त्री समालोचन करत होते. प्रसादने सोहेलला बाद केल्यानंतर शास्त्रींनी “फलंदाजाला उत्तर देण्याचा हा उत्तम मार्ग आहे”, असे म्हटले होते. या घटनेनंतर बर्‍याच वर्षांनंतर आमिर सोहेलने आता आपले मौन सोडले आहे.

हेही वाचा – IPL खेळण्याचं स्वप्न पाहणारा मोहम्मद आमिर आता ‘या’ टी-२० लीगमध्ये खेळणार

आमिर सोहेल म्हणाला, “माझ्यात आणि व्यंकटेश प्रसादमध्ये कोणताही वाद झाला नव्हता. काहीही बोलणे झाले नाही. हे वेगळ्या पद्धतीने सांगितले गेले. शाब्दिक युद्ध झाले नाही. जेव्हा गोलंदाज तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असतो, तेव्हा कसे वागावे हे जावेद मियांदादने आम्हाला सांगितले. हे उलट मानसशास्त्र आहे. गोलंदाजाला कसे विचलित करायचे हे ते त्याने सांगितले होते.”

आमिर सोहेल म्हणाला, “सईद अन्वर आणि मी धावा करत होतो. तो आऊट झाला. अशा परिस्थितीत आमच्यावर दबाव होता. मला वाटले, की भारत सामन्यावर ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहे. मग मी व्यंकटेश प्रसादला विचलित करण्यासाठी बोलत होतो. तिथे अनेक गोष्टी होत्या. या सामन्यात भारत तीन गोलंदाजांसह उतरला होता. आम्हाला माहित होते, की वेळोवेळी खेळपट्टी खराब होणार आहे. एक षटक आधीच कमी करण्यात आले होते. आम्ही ४९ षटकांत २८९ धावांचा पाठलाग करत होतो.”

तो पुढे म्हणाला, “जेव्हा मला असे वाटू लागले, की गोलंदाज व्यंकटेश प्रसाद चांगली गोलंदाजी करत आहेत, तेव्हा मी त्याला पुन्हा विचलित करण्याचा प्रयत्न केला. लोकांनी ही घटना वेगळ्या प्रकारे मांडली. लोक म्हणाले, की मी माझे नियंत्रण गमावले आहे.”

त्या सामन्यात प्रसादच्या एका चेंडूवर सोहेलने कव्हर्सच्या दिशेने चौकार ठोकला आणि नंतर प्रसादला हिणवले. यानंतर, पुढच्याच चेंडूवर वेंकटेशने सोहेलला क्लीन बोल्ड केले. व्यंकटेश प्रसादने या घटनेवर म्हटले होते, ”ती घटना एखाद्याच्या कानशिलात लावण्यासारखी होती. मला सोहेलकडून चौकाराची अपेक्षा नव्हती. ३५ हजार लोकांच्या उपस्थितील हा एक हाय व्होल्टेज सामना होता. या घटनेपूर्वी मी सीमारेषेवर उभा होतो. तो फटकेबाजी करत होता. असे वाटत होते, की हा सामना ४५ षटकांत संपेल. मी प्रेक्षकांकडे पहात होतो. काय घडत होते यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. ”

”सोहलेने चेंडूवर चौकार लगावला. त्यानंतर आपली बॅट आणि बोटाने त्या चौकारा मला पाहण्याल सांगितले. सोहेल म्हणाला, की मी तुला पुढच्या बॉलवरही चौकार ठोकतो. मी फक्त सोहेलचे ऐकले आणि काही शब्द बोलून परत आलो. अनवर ४८ धावांवर बाद झाल्यानंतर सोहेलही पुढच्याच चेंडूवर बोल्ड झाला. पाकिस्तानने संघ हा सामना ३९ धावांनी गमावला”, असेही व्यंकटेश प्रसाद म्हणाला.

हेही वाचा – ‘‘दोन मुलींचा बाप म्हणूनही…”, अश्विनला ‘या’ कारणामुळे लागत नाहीये रात्रभर झोप