ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज आणि एकेकाळी जीवघेण्या वेगाने गोलंदाजी करणाऱ्या शॉन टेटची सोमवारी अफगाणिस्तानच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंकेतील हंबनटोटा येथे पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी ही घोषणा केली.

टेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रशिक्षणाची जबाबदारी घेण्याची ही पहिलीच वेळ असेल. टेटने २००४ ते २०१६ या तीनही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. ‘द वाइल्ड थिंग’ असे म्हटल्या जाणाऱ्या टेटला जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक मानले जाते. त्याने २०१०मध्ये इंग्लंडविरुद्ध १६१.१ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला जो एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरा सर्वात वेगवान चेंडू होता.

 

हेही वाचा – वर्ल्डकपपूर्वी शिक्षा भोगत असलेल्या क्रिकेटपटू्ंनी आपल्याच मायभूमीला दिला धक्का!

टेटने तीन कसोटी, ३५ एकदिवसीय आणि २१ टी-२० मध्ये अनुक्रमे पाच, ६२ आणि २८ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. तेव्हा त्याने ११ सामन्यांत २३ विकेट्स घेतल्या.

कोपराच्या दुखापतीमुळे २०१७मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर टेटने कोचिंगमध्ये हात आजमावला आहे. तो बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्सचा गोलंदाजी प्रशिक्षक राहिला आहे.