ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर सर्व स्तरातून भारतीय संघावर टीका होताना दिसत आहे. त्यातच कर्णधार विराट कोहलीने भारतात परतण्याचा निर्णय घेतल्यामुळे संघासमोरील अडचणींमध्ये अधिक भर पडणार आहे. २६ डिसेंबरपासून मेलबर्नच्या मैदानावर बॉक्सिंग डे कसोटी सुरु होत आहे. या कसोटीत मराठमोळा अजिंक्य रहाणे भारताचं नेतृत्व करेल. पृथ्वी शॉचा खराब फॉर्म, मोहम्मद शमीची दुखापत या गोष्टींमुळे दुसऱ्या कसोटीसाठी संघनिवडीचा पेच भारतीय संघासमोर आहे.

अवश्य वाचा – दुसऱ्या कसोटीआधी वासिम जाफरचा अजिंक्य रहाणेला खास संदेश, पाहा…तुम्हाला कळतोय का याचा अर्थ

दरम्यान, पहिल्या कसोटीत झालेल्या पराभवाची भारतीय संघ व्यवस्थापनाने गंभीर दखल घेतली असून संघातील वरिष्ठ खेळाडूंना आपली कामगिरी सुधाण्यासाठी ताकीद देण्यात आल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना आपली कामगिरी सुधारून जबाबदारी घेण्याची गरज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात निराशाजनक कामगिरी केली होती. याचसोबत दुसऱ्या दिवशी नाईट वॉचमन म्हणून जसप्रीत बुमराहला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याच्या निर्णयावरही मॅनेजमेंट खुश नसल्याचं समोर आलं आहे.

अवश्य वाचा – फोन बंद करा, संघ म्हणून एकत्र या आणि पुढचा विचार करा ! मोहम्मद कैफचा भारतीय संघाला सल्ला

दरम्यान यापुढील मालिकांसाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने तरुण खेळाडूंची फळी तयार करण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय. शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांना पुढील सामन्यांत संधी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. याचसोबत भविष्यकाळासाठी बंगळुरुत NCA मध्ये देवदत पडीकलला पर्यायी डावखुरा सलामीवीर म्हणून तयार करण्यावरही विचार झाल्याचं कळतंय. त्यामुळे यापुढील कसोटी सामन्यांत भारतीय संघाची कामगिरी कशी होते हे पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे.