आयपीएल 2021ला दणक्यात सुरुवात झाली आहे. आतापर्यंत यंदाच्या हंगामात तीन सामने खेळले गेले. करोनाच्या प्रकोपामुळे आयपीएलचा 13वा हंगाम गेल्या वर्षी यूएईमध्ये खेळवला गेला. मात्र,  बीसीसीआयने यावर्षी ही स्पर्धा भारतात खेळवण्याचा निर्णय घेतला.

आयपीएल भारतात परतल्यानंतर सर्व खेळाडूंकडून वेगवेगळी विधाने ऐकायला मिळाली. यासंदर्भात 32 वर्षीय कॅरेबियन अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलनेही एक विधान केले आहे. रसेलने आयपीएलविषयी मोठे विधान करून भारतीय क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली.

गेल्या दहा वर्षांपासून वेस्ट इंडिजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलेला 32 वर्षीय रसेल म्हणाला, “मी गेल्या वर्षाच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहे. आशा करतो, की मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी माझी कामगिरी सुधारेल. सध्या माझी तंदुरुस्ती खूप चांगली आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आम्ही परत भारतात परतलो आहोत. यूएई ही चांगली जागा होती, पण जेव्हा आपण आयपीएलबद्दल बोलतो, तेव्हा याचा अर्थ असा होतो, की आपण भारताबद्दल बोलत आहोत.”

महत्त्वाचे म्हणजे आंद्रे रसेलने 2012मध्ये आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने 9 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण 75 सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 61 विकेट्स घेतल्या आहेत, तर फलंदाजीत 1153 धावा केल्या आहेत.

कोलकाताची हैदराबादवर मात

चेन्नईत रंगलेल्या आयपीएल 2021च्या तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादवर 10 धावांनी विजय मिळवला. नाणेफेकीचा कौल हैदराबादच्या बाजूने लागल्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नितीश राणा आणि राहुल त्रिपाठी यांच्या दमदार अर्धशतकी खेळींच्या जोरावर कोलकाताने 20 षटकात 6 बाद 187 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात हैदराबादला 20 षटकात 5 बाद 177 धावांपर्यंत मजल मारता आली. हैदराबादकडून जॉनी बेअरस्टो आणि मनीष पांडेने अर्धशतकी खेळी केली. मात्र, ते संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. कोलकाताच्या नितीश राणाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. तर, अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल या सामन्यात अवघ्या 5 धावांवर तंबूत परतावे लागले.