बांगलादेशने पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाला टी-२० मालिकेत ४-१ अशी धूळ चारत मालिका आपल्या नावे केली आहे. बांगलादेशने प्रथमच ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-२० मालिकेत विजय मिळवला आहे. शेवटच्या सामन्यात बांगलादेशने प्रथम फालंदाजी करताना ८ विकेट्सच्या मोबदल्यात केवळ १२२ धावा केल्या होत्या. १२२ धवांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाच्या कोणत्याही फालंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही. १३.४ षटकांमध्ये संपूर्ण संघ तंबूत परतला. ऑस्ट्रेलियन संघाला फक्त ६२ धावा करता आल्या. कर्णधार मॅथ्यू वेडने सर्वाधिक २२ धावा काढल्या. ऑस्ट्रेलियाचे तब्बल ९ फलंदाज एकेरी धावसंख्येत बाद झाले. एकेकाळचा दादासंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या या लाजीरवाण्या पराभावानंतर त्यांना ट्रोल केलं जात आहे. अशातच इंग्लंडच्या एका माजी क्रिकेटपटूने ऑस्ट्रेलियन संघाला भारतीय महिला फलंदाज शेफाली वर्माइतक्याही धावा करता न आल्याचा टोला लगावलाय.
ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव
ऑस्ट्रेलिया संघाने वेस्ट इंडिज आणि आता बांगलादेशविरुद्ध सलग टी-२० मालिका गमावल्या आहेत. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी तसेच गोलंदाजी अतिशय सुमार झाली. बांगलादेश संघाच्या सलामीच्या जोडीने ४२ धावा केल्या होत्या, परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढे बांगलादेशच्या फलंदाजांना नंतर मोठ्या भागीदारी करण्यात अपयश आले आणि बांगलादेशचा संघ १२२ धावाच करु शकला. सहाच्या सरासरीने धावा हव्या असल्याने ऑस्ट्रेलिया हा सामना सहज जिंकेल असं वाटतं होतं. मात्र त्यांनी बांगलादेशहून सुमार कामगिरी करत बांगलादेशच्या संघाने उभारलेल्या धावसंख्येच्या आर्ध्याहून एकच धाव अधिक केली आणि सामना तब्बल ६० धावांनी गमावला. या अगोदर ऑस्ट्रेलिया संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत एकदाही १५० च्या वर धावा केल्या नाहीत.
शेफालीची दमदार फलंदाजी
दुसरीकडे याच दिवशी भारताची युवा महिला क्रिकेटपटू आणि लेडी सेहवाग म्हणून ओळखली जाणारी शेफाली वर्माने सध्या सुरु असणाऱ्या ‘द हंड्रेड’ लीगमध्ये दमदार कामगिरी केली. शेफालीने आपल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर बर्मिंगहॅम फिनिक्स संघाला विजय मिळवून दिला. एजबॅस्टन येथे वेल्श फायर आणि बर्मिंगहॅम फिनिक्स या महिला संघांमधील खेळवण्यात आलेला सामना शफालीच्या संघाने १० गडी राखून जिंकला. वेल्श फायर संघाने सलामीवीर ब्रायनी स्मिथच्या (३८) मदतीने १०० चेंडूत ९ गडी गमावून १२७ धावा केल्या. बर्मिंगहॅम संघाला १२८ धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी ७६ चेंडूत गाठले. शफाली वर्माने २२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि नाबाद ७६ धावांची खेळी केली. तिने या डावात ४२ चेंडूंचा सामना केला. शेफालीने आपल्या धडाकेबाज खेळीत ९ चौकार, २ षटकार ठोकले.
Shafali Verma returned to form with an incredible 76* off just 42 balls at Edgbaston
There’s a reason this teenager is rated so highly #TheHundred match report https://t.co/VidKW5qmpi pic.twitter.com/6I38wjPjBJ
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 10, 2021
एकीकडे ऑस्ट्रेलियन संघाला १२० चेंडूत १२२ धावा करताना अवघ्या ६२ धावांमध्ये तंबूत परतावं लागलं तर दुसरीकडे शेफालीनी २२ चेंडूत ५० धावा ठोकत आपल्या संघाला ७६ चेंडूत १२८ धावांचे लक्ष्य पार करण्यात मोलाचा वाटा उचललाय. याच दोन सामन्यांची तुलना करत इंग्लंडची माजी महिला क्रिकेटपटू इसाबेल वेस्टबरीने ऑस्ट्रेलियन संघापेक्षा शेफालीने जास्त धावा केल्याचा टोला ट्विटरवरुन लगावलाय. “शेफाली वर्माने ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी एकत्र मिळून केलेल्या धावांपेक्षा अधिक धावा केल्यात. त्यामुळे ही (बांगलादेशची) उत्तम कामगिरी आहे यावर मी सहमत आहे,” असं इसाबेल म्हणालीय.
Shafali Verma scored more runs than Australia’s chaps combined today and I think you’ll agree that this is a terrific outcome. #TheHundred #BANvAUS
— Isabelle Westbury (@izzywestbury) August 9, 2021
अन्य एका ट्विटमध्ये इसाबेलने ऑस्ट्रेलियन संघापेक्षा जवळजवळ अर्धेच चेंडू खेळून शेफालीने त्यांच्यापेक्षा अधिक धावा केल्याचं म्हटलं आहे.
Facing almost half as many balls. Ah, it just gets better.
— Isabelle Westbury (@izzywestbury) August 9, 2021
ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ही चिंतेची बाब मानली जात आहे. या अगोदर ऑस्ट्रेलियाने एकही टी-२० वर्ल्डकप आपल्या नावे केलेला नाही. शाकिब अल हसनने बांगलादेशकडून सर्वाधिक बळी घेतले. त्याने ४ गडी बाद केले.