World Cup 2019 ही स्पर्धा ३० मे पासून सुरु होणार आहे. इंग्लंड आणि वेल्स मध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी अनेक जण इंग्लंड आणि भारत या दोन संघांना विजेतेपदाचे दावेदार मानत आहेत. विशेष म्हणजे अनेक दिग्गज माजी क्रिकेटपटूंनी या स्पर्धेसाठी आपले विजेते सांगितले आहेत. पण ४ वेळा विश्वचषकावर आपले नाव कोरणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे नाव कोणीही घेताना दिसत नाही. गेल्या काही काळात ढासळलेली कामगिरी आणि स्मिथ – वॉर्नर जोडीची अनुपस्थिती यामुळे अनेकांनी ऑस्ट्रेलियाचे नाव घेणे टाळले आहे. पण निलंबित कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि सलामीवीर डेव्हीड वॉर्नर यांचे संघात पुनरागमन झाल्यास ऑस्ट्रेलिया विश्वचषक स्पर्धा जिंकू शकतो, असा विश्वास माजी फिरकीपटू शेन वॉर्न याने व्यक्त केला आहे.

स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हीड वॉर्नर यांच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक वर्षाच्या बंदीची कारवाई केली आहे. ती बंदी काही दिवसात उठवण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विश्वचषकासाठी त्यांची संघात निवड होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये स्मिथ आणि वॉर्नरला संधी मिळाल्यास पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया जिंकू शकतो, असे फॉक्स स्पोर्टसशी बोलताना वॉर्न म्हणाला.

पुढे तो म्हणाला की दोन्ही खेळाडूंनी पुनरागमन केल्यास त्याचा ऑस्ट्रेलियाला फायदा होऊ शकतो. अनेकदा विसरहनती मिळाली की त्यानंतर पुनरागमन करताना खेळाडू उत्तम कामगिरी करतात. मलाही १२ महिने संघाबाहेर ठेवण्यात आले होते, पण मी नंतर पुनरागमन केले आणि चांगली कामगिरी करू शकलो. विश्रांतीमुळे तुम्ही ताजेतवाने होता आणि तुमचा खेळही बहरतो.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात चेंडू कुरतडल्या प्रकरणी या दोघांवर बंदीची कारवाई करण्यात आली होती. या दोघांव्यक्तिरिक्त बॅनक्रॉफ्टवरही बंदीची कारवाई करण्यात आली होती.