भारतात सुरू असलेला आयपीएल २०२१चा हंगाम अर्ध्यावर आला आहे. सध्या देशात करोनाची स्थितीही गंभीर होत चालली आहे. त्यामुळे संकटात ही स्पर्धा का?, असा सवालही अनेकांकडून केला जात आहे. दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने आयपीएलमधून ब्रेक घेतला आहे. कुटुंबाला करोनाची लागण झाली असल्याने अश्विनने हा निर्णय घेतला. आता एका वृत्तानुसार, आयपीएलमध्ये खेळणारे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूही करोनाच्या भीतीमुळे लीग सोडण्याच्या विचारात आहेत.

भारतातील वाढत्या करोना संख्येनंतर ते आपल्या देशात प्रवेश करू शकणार नाहीत, अशी या क्रिकेटपटूंना भीती आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज अँड्र्यू टायने ‘वैयक्तिक कारणास्तव’ राजस्थान रॉयल्सला अलविदा म्हटले. काही दिवसांपूर्वी लियाम लिव्हिंगस्टोननेही प्रकृतीचे कारण देत आयपीएल सोडले.

सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या वृत्तानुसार, स्कॉट मॉरिसन सरकारने (ऑस्ट्रेलियन सरकारने) भारतातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी केल्याने बरेच ऑस्ट्रेलियन खेळाडू घाबरले आहेत. भारतात दररोज ३.५ करोनाची प्रकरणे समोर येत आहेत.

आयपीएल २०२१मध्ये ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू

स्टीव्ह स्मिथ (दिल्ली कॅपिटल्स), डेव्हिड वॉर्नर (सनरायझर्स हैदराबाद), पॅट कमिन्स (कोलकाता नाइट रायडर्स), ग्लेन मॅक्सवेल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) हे आयपीएलमध्ये भाग घेणाऱ्या 17 ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंपैकी आहेत. जोश हेजलवुड (चेन्नई सुपर किंग्ज), मिच मार्श (सनरायझर्स हैदराबाद) आणि जोश फिलिप (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) यांनी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच आयपीएलमधून माघार घेतली.