काही दिवसांपूर्वीच अनिल कुंबळे यांची भारताच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. कुंबळे यांच्याआधी संघसंचालकपदी असलेले रवी शास्त्री हेही मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत होते. मुख्य प्रशिक्षक म्हणून कुंबळे यांच्या नावाला पसंती मिळू लागताच फलंदाजी प्रशिक्षक म्हणून शास्त्री यांच्या नावाला सल्लागार समितीने प्राधान्य दिले होते. आतापर्यंत भारतीय क्रिकेट

नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) मर्जीतले असणाऱ्या शास्त्री यांच्या नावाला खुद्द बीसीसीआयतर्फेच नकार मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि समन्वयक संजय जगदाळे यांच्या समितीने फलंदाजी प्रशिक्षक म्हणून शास्त्री यांचे नाव सुचवले होते. मात्र समितीचे काम मुख्य प्रशिक्षक निवडणे हे आहे. अन्य कामांमध्ये हस्तक्षेप करु नये अशी थेट भूमिका बीसीसीआयने घेतली.

भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू आणि संघसंचालक म्हणून काम पाहिलेल्या शास्त्री यांनी मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज सादर केला होता. निर्धारित वेळेत त्यांनी आपले सादरीकरण बीसीसीआयसमोर मांडले होते. २१ जून रोजी कोलकाता येथे आयोजित प्रशिक्षक निवडीच्या प्रक्रियेदरम्यान शास्त्री यांनी बँकॉक येथून व्हिडिओच्या माध्यमातून मुलाखत दिली होती. मात्र अनिल कुंबळे आणि टॉम मूडी यांनी शास्त्री यांना मागे टाकत सरशी साधल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र सल्लागार समितीने शास्त्री यांना फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नेमावे अशी सूचना केली.

‘ती बैठक सात ते आठ तास चालली. अनेकविध कल्पना समोर आल्या. समितीने शास्त्री यांचे नाव सुचवले. मात्र त्यावेळी मी हस्तक्षेप केला. समितीचे काम मुख्य प्रशिक्षक नेमण्यापुरतेच मर्यादित आहे. या मर्यादेची समिती सदस्यांना मी कल्पना दिली. जगभरातील व्यावसायिक क्रीडा संघटनांप्रमाणे आपणही काम करणे आवश्यक आहे. मुख्य प्रशिक्षक त्याच्या नियोजनानुसार सहयोगी आणेल. बीसीसीआयच्या कारभारात पारदर्शकता, व्यावसायिकता आणि सर्वोत्तमता आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’, असे बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनी सांगितले.

शास्त्री यांच्या मुलाखतीवेळी समिती सदस्य सौरव गांगुली उपस्थित नव्हता. बंगाल क्रिकेट संघटनेच्या कार्यकारिणी समितीची बैठकीला उपस्थित राहण्यासाठी गांगुलीने परवानगी घेतली होती. शास्त्री यांच्या मुलाखतीवेळी गांगुली जाणीवपूर्वक अनुपस्थित राहल्याची चर्चा होती. मात्र गांगुलीने अन्य बैठकीत सहभागी होण्यासाठी रीतसर परवानगी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘मुख्य प्रशिक्षकपदासाठी शास्त्री यांचे नाव बाजूला पडल्यानंतर अनिल कुंबळे आणि टॉम मूडी यांच्यात चुरस होती. भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार विराट कोहलीने कुंबळे यांच्या नावाला पसंती दिली आणि कुंबळे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. कुंबळे आणि मूडी या दोघांनी अत्यंत व्यावसायित पद्धतीने सादरीकरण दिले होते. प्रशिक्षणाचा पूर्वअनुभव असल्याने मूडी यांचे पारडे जड होते. मात्र विदेशात भारतीय फिरकीपटूंचे प्रदर्शन सुधारावे या उद्देशाने कोहलीने कुंबळे यांच्या नावाला पसंती दिली. आशियाई उपखंडाबाहेर आपले फिरकीपटू कसोटी जिंकून देऊ शकत नाहीत ही आकडेवारी बदलण्यात कुंबळे निर्णायक भूमिका बजावू शकतात. अशी भूमिका कोहलीने घेतली’, असे सूत्रांनी सांगितले.

याआधी शास्त्री यांनीच संघसंचालक म्हणून कायम रहावे असा सूर कोहलीने व्यक्त केला होता. युवा खेळाडूंना आत्मविश्वास मिळवून देण्याचे काम शास्त्री यांनी केले आहे. ठोस भूमिका घेणारे शास्त्री संघासाठी उपयुक्त आहेत असे कोहलीने सांगितले होते. मात्र शास्त्री यांचे नाव मागे पडताच कोहलीने कुंबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.