वेगवान गोलंदाज अँडरसनकडून सहकाऱ्याची पाठराखण

लंडन : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील अखेरच्या षटकात दुसरी धाव घेताना बॅटला लागून चौकार गेल्यामुळे इंग्लंडच्या बेन स्टोक्सने पंचांना चार धावा न देण्यास विनंती केली होती; परंतु पंचांनीच नियमानुसार ते योग्य असल्याचे सांगून चार धावा दिल्या, अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने व्यक्त केली.

मार्टिन गप्टिलच्या त्या थ्रोमुळे सध्या क्रिकेटवर्तुळात फार चर्चा रंगलेली असताना काहींनी स्टोक्सच्या खिलाडूवृत्तीवरसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परंतु अँडरसनने स्टोक्सची बाजू घेत स्वत:चे मत याविषयी व्यक्त केले. ‘‘अंतिम सामन्यानंतर मायकल वॉनने स्टोक्सशी संवाद साधला. त्याने दिलेल्या माहितीनुसार स्टोक्सने पंचांना ओव्हर-थ्रोच्या धावा न देण्याचे सुचवले होते. परंतु पंचांनी नियमानुसार इंग्लंडला ‘ओव्हर-थ्रो’च्या चार धावा दिल्या आणि स्टोक्सचे अपील फेटाळले,’’ असे अँडरसन म्हणाला.

‘‘त्या ‘ओव्हर-थ्रो’नंतर अनेकांनी ‘आयसीसी’ तसेच पंचांवर टीका केली. परंतु पंचसुद्धा शेवटी मनुष्यच आहेत. माझ्या मते, त्या चेंडूला रद्द घोषित करून नवा चेंडू टाकण्याचा पर्यायसुद्धा अवलंबता आला असता,’’ असेही ३६ वर्षीय अँडरसनने सांगितले. तर अंतिम सामन्याचा सामनावीर ठरलेल्या स्टोक्सने नशिबाने मिळालेल्या त्या चार धावांची मला आयुष्यभर खंत राहील, असे मत व्यक्त केले होते.