इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने आयपीएल २०२१मधून बाहेर पडल्यानंतर भारतीय खेळपट्ट्यांबाबत एक ट्विट केले आहे. या खेळपट्ट्यांना स्टोक्सने कचरा म्हटले आहे. लीगचा पहिला टप्पा एम.ए. चिदंबरम स्टेडियम आणि मुंबईतील वानखेडे स्टेडियम या दोन ठिकाणी खेळवण्यात येत आहे. दोन्ही ठिकाणच्या या खेळपट्ट्या पूर्णपणे भिन्न आहेत.
काय म्हणाला स्टोक्स?
आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमधून पाहिले, तर मुंबईच्या खेळपट्टीवर २०० धावांचे लक्ष्यही पूर्णपणे सुरक्षित नाही. तर चेन्नईची खेळपट्टी ही संथ असल्याचे समोर आले आहे. चेपॉकच्या खेळपट्टीवर १५० धावांचे लक्ष्य गाठतानाही संघाची अवस्था कठीण होत आहे. स्टोक्स आपल्या ट्विटमध्ये म्हणाला, ”आशा आहे की, जसजसे आयपीएल पुढे जाईल, तशी खेळपट्टी खराब होऊ नये. कमीत कमी १६०-१७० धावा बरोबर आहेत, पण १३०-१४० धावा खेळपट्ट्यांना कचरा बनवत आहेत.”
Hope the wickets don’t get worse as the @IPL gets deeper into the tournament..160/170 minimum not scraping to 130/140 cause the wickets are trash..
— Ben Stokes (@benstokes38) April 23, 2021
राजस्थान रॉयल्सचा प्रमुख खेळाडू असलेल्या बेन स्टोक्सच्या डाव्या हाताच्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे तो १२ आठवडे क्रिकेटपासून दूर असेल. आयपीएल सामन्यादरम्यान त्याला ही दुखापत झाली. या दुखापतीमुळे स्टोक्स संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे.
आयपीएलव्यतिरिक्त तो इंग्लंडच्या जूनमध्ये होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांसाठी आणि जुलैदरम्यान श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी इंग्लंड संघात सहभागी होणार नाही. या मालिकेनंतर त्यानंतर इंग्लंडला ८ ते ११ जुलै दरम्यान पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे. बेन स्टोक्सशिवाय राजस्थानचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरही यंदाच्या आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही.