टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हाच टीम इंडियाचा बॉस आहे. खेळाडू म्हणून त्याने स्वतःला सिद्ध केले आहेच शिवाय एक माणूस म्हणूनही तो विचारांनी पक्का आणि परिपक्व झाला असे गौरवोद्गार टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काढले आहेत. विराट टीम इंडियाचा कर्णधार आहे. मी त्याला संघ कसा चांगल्या प्रकारे खेळ करेल याचे सल्ले देऊ शकतो मात्र त्याने माझे सगळे ऐकलेच पाहिजे यासाठी मी आग्रही नाही. आम्हा दोघांमध्ये विश्वासाचे नाते तयार झाले आहे. क्रिकेट जागतिक स्तरावर लोकप्रिय खेळ आहे यात टीम इंडियाची कामगिरी अधिकाधिक कशी चांगली होईल हे पाहणे आम्हा दोघांचेही काम आहे. आम्ही समन्वयाने काम करतो आहोत याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे असेही रवी शास्त्री यांनी म्हटले आङे.

रवी शास्त्री यांनी त्यांच्या क्रिकेट करियरमध्ये ८० टेस्ट आणि १५० वनडे मालिका खेळल्या आहेत. सध्या ते टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. काही मुद्द्यांबाबत विराट आणि माझे विचार वेगळे आहेत मतही भिन्न आहेत. पण त्याचा परिणाम आमच्या नात्यावर झालेला नाही. आमच्यात कोणतीही कटुता किंवा गैरसमज नाही असेही रवी शास्त्रींनी म्हटले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातले वृत्त दिले आहे. २०१९ च्या विश्वचषकापर्यंत रवी शास्त्री टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून काम करणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच विराट आणि अनुष्का यांच्या लग्नाची बातमी आली. अनेकांसाठी हा सुखद धक्का होताच. २१ तारखेला या दोघांचे मुंबई रिसेप्शनही होणार आहे. अशात मुंबईत येण्याआधीच टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहलीला टीम इंडियाचा बॉस म्हणत एक प्रकारे एक छान गिफ्टच दिले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. विराट कोहलीचा खेळ हा त्याचा नावाला साजेसा म्हणजे विराट असाच आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया विश्वचषक जिंकणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.