कोपा अमेरिका स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य सामन्यात अर्जेंटिनाचा संघ कोलंबियासमोर उभा ठाकणार आहे. मेस्सी यासह आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय विजेतेपदासाठी झुंज सुरू ठेवणार आहे. त्याने कोपा अमेरिकेतील दमदार कामगिरीसह संघाला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवले. बुधवारी सकाळी अर्जेंटिना विरुद्ध कोलंबिया सामना रंगणार आहे. मेस्सी १५०वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल.

पहिल्या गटस्तरीय सामन्यात चिलीविरूद्ध गोल नोंदवत ३४ वर्षीय मेस्सीने स्पर्धेत चांगली सुरुवात केली. त्यानंतर उरुग्वेविरुद्ध अर्जेंटिनाने १-० ने विजय मिळवला. बोलिव्हियाविरुध्द ४-१ने मिळवलेल्या विजयात मेस्सीने २ गोल केले होते. मागील सामन्यातही त्याने इक्वाडोर विरुद्ध त्याने दोन गोल करण्यात मदत केली. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वांनी मेस्सीची जादू पाहिली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यातही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. त्याने या स्पर्धेत चार गोल केले आहेत.

अर्जेंटिना विरुद्ध कोलंबिया

कोपा अमेरिका स्पर्धेतील दुसरा उपांत्य फेरीचा सामना हा अर्जेंटिना विरुद्ध कोलंबिया या दोन संघात रंगणार आहे. साखळी फेरीत अर्जेंटिनाने ३ सामन्यात विजय, तर एक सामना बरोबरीत सुटला आहे. उरुग्वेला (०-१), पॅराग्वेला (०-१) आणि बोलिवियाला (१-४) ने पराभूत केले आहे. तर चिले विरुद्धचा सामना बरोबरीत सुटला आहे. उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाने इक्वाडोरला ३-० ने पराभूत करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

हेही वाचा – विक्रमवीर..! जेम्स अँडरसनने घेतले १००० बळी

कोलंबियाची कामगिरी पाहता अर्जेंटिनाचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. कोलंबियाने इक्वाडोर आणि पेरूला साखळी फेरीत पराभूत केले आहे. तर व्हेनेजुएलासोबतचा सामना बरोबरीत सुटला आहे. दुसरीकडे ब्राझीलने कोलोम्बियाला २-१ ने पराभूत केले होते. उपांत्यपूर्व फेरीत कोलंबिया विरुद्ध उरुग्वे सामना चांगलाच रंगला. ९० मिनिटांच्या खेळात दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे सामना पेनल्टी शूटआउटमध्ये गेला. यावेळी कोलोम्बियाने सामना ४-२ ने जिंकला. आता ७ जुलैला अर्जेंटिना विरुद्ध कोलोम्बिया उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. त्यामुळे या दोन संघातून कोणता संघ अंतिम फेरी गाठतो, याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत.