भारताची स्टार महिला शटलर पी. व्ही. सिंधूने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश नोंदवत पदक निश्चित केले आहे. सुवर्णपदक जिंकण्यापासून सिंधू फक्त दोन पाऊल दूर आहे. टोक्यो ऑलिम्पिक ही स्पर्धा मागच्या वर्षी होणार होती, पण करोनाच्या उद्रेकामुळे ती एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली. या करोनाच्या महाभयंकर काळात क्रीडाविषयक उपक्रम बंद होते. अनेक खेळाडूंना व्यवस्थितरित्या प्रशिक्षण घेणे शक्य होत नव्हते, पण सिंधूने या वेळेचा उपयोग ऑलिम्पिकच्या तयारीसाठी केला आणि आज त्याचे फलित सर्वांसमोर आहे.

२०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या सिंधूने या करोना काळात आपल्या तंत्रावर आणि शैलीवर भर दिला. ती म्हणाली, ”करोनाकाळातील वेळ माझ्यासाठी उपयोगी ठरला. तांत्रिंक बाबींवर लक्ष केंद्रि करण्यासाठी मी हा वेळ उपयोगात आणला आणि निश्चितच मला त्याचा फायदा झाला. या महामारीचा माझ्या ऑलिम्पिक तयारीवर परिणाम झाला नाही.”

हेही वाचा – डॅशिंगच..! महेंद्रसिंह धोनीच्या ‘त्या’ फोटोमुळं सोशल मीडियावर उठलं रान!

सिंधू पुढे म्हणाली, ”कधीकधी आम्ही जेव्हा स्पर्धेला जातो, तेव्हा आम्हाला प्रशिक्षण घेण्यास कमी कालावधी मिळतो. पण यावेळी चांगले प्रशिक्षण घेता आले. त्यामुळे करोनाचा माझ्या तयारीवर नक्कीच परिणाम झाला नाही, याउलट मला बरेच शिकायला मिळाले.”

जपानच्या यामागुचीवर सहज साधली सरशी

सिंधूने आपला आक्रमक फॉम कायम राखत टोक्यो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुचीवर सहज सरशी साधली. सिंधूच्या नव्या शैलीसमो यामागुची निष्प्रभ ठरली. तिने यामागुचीचा २१-१२, २२-२० असे सरळ सेटमध्ये नमवले. उपांत्य फेरीच्या लढतीत सिंधूसमोर ताई जू यिंग किंवा रत्नाचोक इंतानोन यापैकी एकजण आमनेसामने असेल.