इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) सुरु होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या अक्षर पटेलला करोनाची लागण झाली. त्यानंतर अक्षर करोनावर मात कधी करणार आणि त्याचं संघात पुनर्रागमन कधी होणार याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. आता दिल्ली कॅपिटल्सनं त्याची प्रकृती ठिक असल्याचं सांगत तो लवकरच संघात परतेल असं सांगितलं आहे. अक्षर पटेल सध्या सर्व करोना प्रोटोकॉलचं पालन करत आहे.

अक्षर पटेलची करोना चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर २८ मार्चला त्याने दिल्ली कॅपिटल्स संघासोबत हॉटेलमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर केलेल्या चाचणीत त्याला करोना झाल्याचं समोर आलं. तेव्हापासून अक्षरला दहा दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आलं आहे. शनिवारी अक्षरच्या क्वारंटाइनचे दहा दिवस पूर्ण झाले आहेत. आता पुढच्या ३ ते ४ चाचण्यांमध्ये करोना निगेटीव्ह आल्यास त्याला संघात सहभागी करण्यात येईल, असं दिल्ली टीमच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.

लुप्त होत असलेल्या गेंड्यांच्या प्रजातींसाठी रोहित शर्माचा पुढाकार; RCB विरुद्धच्या सामन्यात घातले खास बूट

अक्षर पटेलने आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत ९७ सामने खेळले असून ८० गडी बाद केले आहेत. आयपीएलच्या २०१३च्या पर्वात अक्षर पटेल पहिल्यांदा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सहभागी झाला होता. त्यानंतर २०१४ ते २०१९ या कालावधीत तो किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये खेळाला. त्यानंतर त्याला दिल्लीकडून खेळण्याची संधी मिळाली. आयपीएल २०२०च्या पर्वात त्याने १५ सामन्यात ९ गडी बाद केले होते. धावसंख्या रोखण्याची मोठी जबाबदारी अक्षर पटेलच्या खांद्यावर होती आणि त्याने ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.

‘‘माझ्यासाठी सुरेश रैनाची…’’, सामन्यापूर्वी दिल्लीच्या पाँटिंगने रैनाविषयी केले वक्तव्य

अक्षरने फेब्रुवारी मार्च दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही चांगली कामगिरी केली होती. दुखापतीमुळे तो पहिली कसोटी खेळू शकला नाही. मात्र उर्वरित तीन कसोटी सामन्यात त्याने २७ गडी बाद केले. त्यानंतर टी २० मालिकेत त्याला फक्त एक सामना खेळता आला आणि एकदिवसीय मालिकेत तो संघाचा भाग नव्हता.

दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर यालाही इंग्लंडविरुद्ध खेळताना दुखापत झाली होती. त्यानंतर तो संपूर्ण आयपीएल स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. त्याच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्याकडे दिल्लीच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर अक्षर पटेलला करोना झाल्याने त्याला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या पहिल्या सामन्याला मुकावं लागलं आहे.