भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला प्रेक्षकांनी अपेक्षित प्रतिसाद न दिल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया चिंतेत पडलं आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी संपूर्ण दिवसात 23 हजार 802 प्रेक्षक मैदानात हजर होते. 2013 साली अॅडलेडच्या मैदानाचं पुनर्निर्माण झाल्यानंतर एखाद्या कसोटी सामन्याला हजर राहिलेली ही सर्वात कमी प्रेक्षकसंख्या ठरली आहे. यामुळे आगामी दौऱ्यात भारताने दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याचा विचार करावा अशी विनंती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली आहे.

ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. मागच्या वर्षी अॅशेल मालिकेतील अॅडलेडवर झालेल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी 55 हजार प्रेक्षक उपस्थित होते. याचसोबत दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद होता. या तुलनेने भारताविरुद्ध सामन्याला प्रेक्षकांची कमी पसंती मिळताना दिसत आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : भारताचे दमदार पुनरागमन; दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया ७ बाद १९१

“अॅडलेड कसोटीला मिळालेला अल्प प्रतिसाद पाहता, हा सामना दिवस-रात्र खेळवायला हवा होता हे माझं मत अधिक ठाम झालं आहे. प्रेक्षकांना काय हवं असतं याचा विचार करणंही गरजेचं होतं, कसोटी सामन्याला मिळालेला प्रतिसाद पाहता प्रेक्षकांनी त्यांचा निकाल दिलाय. दिवस-रात्र कसोटी सामना न खेळवल्यामुळे एक विशिष्ट प्रेक्षकवर्ग आम्ही गमावलाय यात काही शंकाच नाही. त्यामुळे पुढच्या दौऱ्यात भारत दिवस-रात्र कसोटी सामना खेळेल अशी आशा आहे.” क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य अधिकारी केविन रॉबट्स यांनी SEN रेडीयोला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 2020-21 भारत पुन्हा ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे.