भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने २०१९ विश्वचषक स्पर्धेत आपला धडाकेबाज फॉर्म कायम ठेवला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्ध सामन्यातही शतकी खेळीची नोंद केली. मँचेस्टरच्या मैदानात रोहितने ८५ चेंडूत शतक झळकावलं. या विश्वचषक स्पर्धेतलं रोहित शर्माचं हे दुसरं शतक ठरलं आहे.

या शतकी खेळीसह रोहित शर्माने कोणत्याही भारतीय खेळाडूला न जमलेली कामगिरी करुन दाखवली आहे. वन-डे क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध सामन्यात सलग शतक झळकावणारा रोहित पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी २०१८ साली रोहित पाकिस्तानविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. या सामन्यात रोहितने नाबाद १११ धावांची खेळी केली होती.

दरम्यान १४० धावांची खेळी करुन रोहित शर्मा हसन अलीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. रोहितने ११३ चेंडूत १४० धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.

अवश्य वाचा – Ind vs Pak : रोहित शर्मा चमकला, सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्थान