चेन्नई सुपर किंग्जचा संघ (सीएसके) आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. संघातील खेळाडू यूएईमध्ये जोरदार सराव करत आहेत. सराव सत्रादरम्यानचे व्हिडिओ सीएसकेच्या ट्विटरवरही शेअर केले जात आहे. दरम्यान, सीएसकेच्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये धोनी जुन्या स्टाइलमध्ये फटकेबाजी करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये धोनी उत्तुंग षटकार मारत आहे.

सीएसकेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सर्वात खास गोष्ट म्हणजे धोनीने मारलेला चेंडू इतका लांब गेला आहे, की तो शोधण्यासाठी धोनी आणि सहकारी खेळाडू पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहेत.

 

धोनीचा स्फोटक फॉर्म पाहून त्याचे चाहते खूप आनंदी झाले आहेत. आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होईल. या टप्प्याचा पहिला सामना सीएसके आणि मुंबई इंडियन्स संघादरम्यान खेळला जाईल. गेल्या हंगामाच्या तुलनेत या हंगामात सीएसकेच्या संघाची कामगिरी उत्तम राहिली आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – ENG vs IND : विराटमुळं वातावरण तापलं, LIVE कॉमेंट्री दरम्यान गावसकर-हुसेन यांच्यात झाला वाद

दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सचा संघ सध्याच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे, तर कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्स सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या टप्प्यात सर्व संघ आपापले सामने जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. त्यामुळे टप्प्याचे सामने अत्यंत रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत चेन्नईने स्पर्धेत ५ सामने जिंकले आहेत.

धोनी पुढच्या वर्षी आयपीएल खेळेल, की नाही याबद्दल चाहत्यांमध्ये संशयाचे वातावरण आहे. मात्र, सीएसके व्यवस्थापनानुसार, तो आणखी काही वर्षे संघाता भाग असेल.