इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. जगभरात धोनीचे अनेक चाहते आहेत, मात्र एकेकाळचा आपलाच सहकारी युवराज सिंहच्या वडिलांकडून धोनीला नेहमी टीका सहन करावी लागली आहे. युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी याआधी अनेक मुलाखतींमध्ये धोनीवर टीका केलेली आहे. News24 वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये योगराज सिंह यांनी आणखी एक आरोप केला आहे. धोनी आणि विराट या दोघांनीही युवराजला धोका दिला आहे, एका प्रकारे हे पाठीत खंजीर खुपसल्यासारखं असल्याचं योगराज म्हणाले.

वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत योगराज यांना, धोनी-विराटने युवराजला धोका दिला का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना योगराज सिंह म्हणाले, “मी असं म्हणेन की या दोघांसोबत निवड समितीनेही युवराजला धोका दिला आहे. मी काही दिवसांपूर्वी रवी शास्त्री यांना भेटलो, त्यांच्याशी बोलताना मी हा मुद्दा काढला होता. अनेकांनी युवराजला धोका दिला आहे आणि या गोष्टीचा त्याला नेहमी त्रास झाला आहे.” योगराज सिंह यांनी यादरम्यान निवड समितीचे सदस्य शरणदीप सिंह यांच्यावर थेट निशाणा साधला.

“शरणदीप जेव्हा कधीही संघनिवडीची बैठक व्हायची त्यावेळी सांगायचा की युवराजला संघातून वगळलं पाहिजे. अशा लोकांना बोर्ड निवड समितीवर बसवतं, यांना क्रिकेटमधलं मुलभूत ज्ञानही नाही. अशा लोकांकडून तुम्ही काय अपेक्षा करणार?? युवराजने चांगली कामगिरी केली तर आपलं कसं होणार याची सर्वांचा चिंता असायची. पण अशा घटनांमुळे खेळाडूला नेहमी दुःख होतं.” १० जून २०१९ रोजी युवराज सिंहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली होती. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत खुद्द युवराज सिंहनेही आपल्याला विराट आणि धोनीकडून म्हणावा तसा पाठींबा मिळाला नसल्याचं म्हटलं होतं. याचसोबत सुरेश रैना धोनीचा सर्वात आवडता खेळाडू असल्याचंही युवराज म्हणाला होता.