सध्या भारतीय संघाबाहेर असणारा यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक लवकरच एका एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. दिनेश कार्तिक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम साामन्यादरम्यान समालोचन करताना दिसणार आहे. सुनील गावसकर यांच्यासह कार्तिकचा समालोचकांच्या गटात समावेश करण्यात आला आहे. कार्तिक समालोचनाकडे वळला असला, तरी तो टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्यासाठी आतुर आहे. आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी आपल्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळवायचे आहे, असे कार्तिकने एका मुलाखतीत सांगितले.

दिनेश कार्तिक स्पोर्ट्सकीडाशी झालेल्या संभाषणात म्हणाला, ”जर तुम्ही माझे टी-२० क्रिकेटमधील आकडे पाहिले, मग ते घरगुती क्रिकेट असो की आयपीएल, तर त्यानुसार मी टीम इंडियामध्ये शंभर टक्के असावे असे मला वाटते. मला टीम इंडियामध्ये स्थान मिळावे, असा माझा विश्वास आहे. आता बाकी निवडकर्त्यांचा विचार काय आहे यावर ते अवलंबून आहे.”

हेही वाचा – अभिनंदन अजिंक्यसेना..! टीम इंडियाच्या ‘त्या’ पराक्रमाचा ICCनं केला मोठा सन्मान

कार्तिक म्हणाला, ”मला वाटते, की मी मधल्या फळीत हातभार लावू शकतो. मला टी-२० वर्ल्डकपमध्ये माझे कौशल्य दाखवायचे आहे. खेळपट्टीवर मी काय प्रभाव सोडतो ते पाहण्याची बाब आहे. भारतीय संघाला अशा खेळाडूची गरज आहे, असा माझा विश्वास आहे. मागच्या वेळी मी त्याला एक उदाहरण दिले होते. मला खात्री आहे, की जर मी माझे कौशल्य दाखवले, तर भारताला वर्ल्डकप जिंकण्याची चांगली संधी आहे.”

आयपीएलच्या १४व्या हंगाम कार्तिक कोलकाता नाइट रायडर्स संघाचा भाग आहे. त्याला अपेक्षेनुसार चांगली कामगिरी करता आली नाही. करोनामुळे आयपीएल २९ सामन्यानंतर स्थगित करण्यात आले, मात्र उर्वरित सामने आता यूएईत होणार आहेत. यंदाच्या टी-२० वर्ल्डकपपूर्वी कार्तिकला आयपीएलमध्ये उत्तम प्रदर्शन करावे लागेल, जेणेकरून निवडकर्ते त्याच्या नावाचा विचार करू शकतील.