पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या मालिकेचा दुसरा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना काल १८ जुलै रोजी लीड्सच्या हेडिंग्ले येथे खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानला ४३ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजीसाठी करताना इंग्लंडने १९.५ षटकांत सर्वबाद २०० धावा केल्या. या मालिकेच्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणाऱ्या लियाम लिव्हिंगस्टोनने या सामन्यातही जबरदस्त फलंदाजी केली. लिव्हिंगस्टोनने २३ चेंडूत ३८ धावा केल्या आणि तीन शानदार षटकारही ठोकले. यापैकी त्याने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस राऊफला मारलेला षटका आरपार गेला. हा चेंडू स्टेडियमच्याही बाहेर गेला.

इंग्लंड क्रिकेटने लिव्हिंगस्टोनने मारलेल्या या षटकाराचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. लिव्हिंगस्टोनच्या या षटकाराची मोठी चर्चा होत आहे, काही लोक टी-२० क्रिकेटमधील हा सर्वात मोठा षटकार असल्याचेही म्हणत आहेत. या सामन्यात इयान मॉर्गन खेळत नसल्याने जोस बटलरने इंग्लंडचे नेतृत्व केले. बटलरने ३९ चेंडूत ५९ धावा केल्या. मोईन अलीने १६ चेंडूत ३६ धावांची शानदार खेळी साकारली.

 

हेही वाचा – “द्रविड कोच असता तर करण जोहरची ‘ते’ करायची हिंमत झाली नसती”

इंग्लंडकडून बटलर, मोईन आणि लिव्हिंगस्टोनने सर्वाधिक धावा केल्या. पाकिस्तानकडून हॅरिस राऊफने दोन गडी बाद केले, तर फलंदाजी करताना ४८ धावाही व्यतीत केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान २० षटकांत ९ बाद १५५ धावा करू शकला. साकीब महमूदने तीन तर मोईन अलीने दोन गडी बाद केले. या विजयासह इंग्लंडने मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे.