कसोटी क्रिकेट हा क्रिकेटचा आत्मा आहे असं म्हटलं जातं. कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूचा खरा कस लागतो. त्यामुळे कसोटी क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. कसोटी क्रिकेटला प्रेक्षकवर्ग मिळावा यासाठी दिवस-रात्र कसोटी सामन्यांचा प्रयोग करण्यात आला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला, पण आता क्रिकेटची सर्वोच्च परिषद असलेली ICC कसोटी क्रिकेट सामन्यांचा कालावधी कमी करण्याचा विचार करत आहे.

काय म्हणाला बेन स्टोक्स?

कसोटी सामना म्हणजे पाच दिवस हे समीकरण आहे. पण प्रत्येक वर्षातील प्रचंड गजबजलेले क्रिकेट दौरे लक्षात घेता ICC कसोटी क्रिकेट सामन्याचे स्वरूप बदलून ते ४ दिवसांचे करण्याचा विचार करत आहे. याबाबत क्रिकेट वर्तुळातून टीकेचा सूर उमटत आहे. अनेक आजी-माजी क्रिकेटपटू यास विरोध करत आहेत. काहींनी तर या कल्पनेवर सडकून टीका केली आहे. तशातच इंग्लंडचा स्टार खेळाडू बेन स्टोक्स यानेही यावर मत प्रदर्शित केले आहे. “दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा आमचा सामना अत्यंत चुरशीचा झाला. या सामन्याचा निकाल पाचव्या दिवशीच्या खेळाच्या तिसऱ्या सत्रात लागला. याच कारणामुळे मला वाटतं की कसोटी क्रिकेट हे पाच दिवसाचंच असायला हवं. कारण पाच दिवसीय कसोटी हा क्रिकेटचा सर्वोत्तम स्पर्धात्मक प्रकार आहे”, असे बेन स्टोक्सने स्पष्ट केले. इंग्लंडचा माजी फिरकीपटू अश्ले गाईल्स यानेही या कल्पनेचा विरोध केला आहे.

गौतम गंभीरनेही केला विरोध

गौतम गंभीरने आपल्या स्तंभात चार दिवसाच्या कसोटी सामन्याच्या कल्पनेबद्दल रोखठोक मत व्यक्त केले आहे. “चार दिवसाच्या कसोटी सामन्याची कल्पना हे अत्यंत मूर्खपणाचे आहे. ही कल्पना अजिबात अंमलात आणली जाऊ नये. ही कल्पना म्हणजे अनिर्णित सामन्यांना निमंत्रण असेल. फिरकीपटूंना स्वत:ला सिद्ध करण्याची पुरेशी संधी मिळणार नाही. त्यामुळे कसोटी क्रिकेटची मजा कमी होईल. अशा कल्पनांपेक्षा खेळाडू आणि खेळपट्टीचा दर्जा याकडे लक्ष देण्याची गरज आहे”, असे गंभीरने नमूद केले.