युरो कप २०२० मधील स्वित्झर्लंड विरुद्ध फ्रान्स हा सामना फुटबॉल चाहत्यांसाठी खरोखरच डोळ्याचं पारणं फेडणारा ठरला. स्वित्झर्लंडच्या यान सोमेरने फ्रान्सचा स्ट्राइकर केलियन माबपेने मारलेला पेनल्टी शॉर्ट अडवला आणि युरो कप २०२० मधील सर्वात धक्कादायक निकाल जगासमोर आला. स्वित्झर्लंडच्या संघाने जग्गज्जेत्या फ्रान्सचा पेनल्टी शूट आऊटमध्ये ४-५ च्या फरकाने धुव्वा उडवत मोठ्या थाटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अतिरिक्त वेळ दिल्यानंतरही सामना ३-३ च्या बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शूट आऊटने सामन्याचा निकाल लावण्यात आला. पेनल्टी शूट आऊटमध्येही अटीतटीचा सामना पहायला मिळाला. मात्र फ्रान्सच्या माबपेचा अगदी शेवटचा शॉर्ट यान सोमेरने अडवला आणि सामना ५-४ च्या फरकाने स्वित्झर्लंडने जिंकला. आता उपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडचा सामना स्पेनशी होणार आहे. १९३८ नंतर पहिल्यांदाच स्वित्झर्लंडने बादफेरीच्या पुढे मजल मारलीय. तर कोणत्याही मोठ्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये स्वित्झर्लंडने धडक मारण्याचा योग हा ६७ वर्षानंतर जुळून आलाय. यापूर्वी ते १९५४ मध्ये विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळले होते.

स्वित्झर्लंड विरुद्ध फ्रान्स सामन्यामध्ये फ्रान्सचं पारडं जड असेल असं अधीपासून मानण्यात येत होतं. हे अगदी सामन्याच्या ८१ व्या मिनिटापर्यंत दिसून आलं. दोन ३-१ च्या फरकाने फ्रान्स अपेक्षित विजय मिळवले असं मानलं जात असतानाच स्वित्झर्लंडच्या संघाने शेवटच्या दहा मिनिटांमध्ये दोन गोल करत सामना ३-३ च्या बरोबरीत सोडवला. नंतरच्या अतिरिक्त वेळातही कोणत्याही संघाला गोल करता आला नाही.

स्वित्झर्लंडच्या हॅरीस सेफेरोव्हिकने सामन्याच्या १५ व्या आणि ८१ व्या मिनिटाला गोल केला तर स्वित्झर्लंडसाठी तिसरा गोल सामन्याच्या ८९ मिनिटाला मारियो गॅव्हरानोव्हिकने नोंदवला. दुसरीकडे फ्रान्ससाठी दुसऱ्या हाफच्या पहिल्या १५ मिनिटांमध्ये दोन गोल नोंदवले. हे दोन्ही गोल कारिम बेन्झीमाने ५७ व्या व ५९ व्या मिनिटाला नोंदवले. तर पॉल पोग्बाने ७५ व्या मिनिटाला गोल नोंदवत फ्रान्सची आघाडी ३-१ वर नेली. मात्र त्यानंतर अवघ्या १४ मिनिटांमध्ये स्वित्झर्लंड दोन गोल करत सामना ३-३ च्या बरोबरीत सोडवला.

साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात फ्रान्सने जर्मनीचा १-० ने पराभव केला होता. हंगेरीविरुद्धचा दुसरा सामना १-१ ने बरोबरीत सुटला होता. तर पोर्तुगालविरुद्धच्या सामन्यात २-२ अशी बरोबरी राखण्यात यश आलं होतं. त्यामुळे तगड्या संघांसमोर फ्रान्सची कामगिरी उत्तम राहिल्याने ते स्वित्झर्लंडचा सहज पराभव करतील असं मानलं जात होतं. दुसरीकडे स्वित्झर्लंडची या स्पर्धेतील साखळी फेरीतील कामगिरी तितकीशी चांगली नसल्याने या सामन्यात त्यांना फेव्हरेट मानलं जात नव्हतं. वेल्सविरुद्धच्या पहिला सामना १-१ ने बरोबरीत सुटला. त्यानंतर इटलीकडून ३-० ने पराभव सहन करावा लागला. तर तिसऱ्या सामन्यात स्वित्झर्लंडने टर्कीचा ३-१ धुव्वा उडवला होता. स्वित्झर्लंडने हात फॉर्म कायम ठेवत फ्रान्सलाही धूळ चारण्याचा पराक्रम केलाय. या पराभवामुळे पोर्तुगालपाठोपाठ फ्रान्सचा दादा संघही स्पर्धेबाहेर फेकला गेलाय.