यूरो कप २०२० स्पर्धेदरम्यान कोका कोला कंपनीवर वक्रदृष्टी पडल्याचं दिसत आहे. पोर्तुगलचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियाने रोनाल्डो याने पत्रकार परिषदे दरम्यान समोर असलेल्या कोका कोलाच्या बाटल्या हटवल्यानंतर कंपनीला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला होता. आता तसंच कृत्य इटलीचा स्टार फुटबॉलपटू मॅन्युअल लोकेटेली याने केलं आहे. त्यामुळे खेळाडूंसमोर कोका कोलाच्या बाटल्या ठेवायच्या की नाही?, असा प्रश्न आयोजकांना पडला आहे.

यूरो कप २०२० स्पर्धेच्या ‘अ’ गटातील चौथ्या सामन्यात इटलीने स्वित्झर्लंडला ३-० ने मात दिली. सलग दोन विजयांसह इटलीने बाद फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेत लोकेटेलीने दोन गोल केले. मिलफिल्डर मॅन्युअल लोकेटेली याने २६ व्या आणि ५२ व्या मिनिटाला दोन गोल केले. लोकेटेलीने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन गोल केले आहेत. त्याला या कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. यासाठी सामन्यानंतर एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या पत्रकार परिषदेत लोकेटेली समोर दोन कोका कोलाच्या बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या. मात्र पत्रकार परिषदेला बसण्यापूर्वी त्याच्या हे लक्षात आलं आणि त्याने बाटल्या हटवल्या. कॅमेऱ्यात त्या बाटल्या दिसणार असं कृत्य केलं. त्यानंतर त्याने पाण्याची बॉटल समोर ठेवली आणि हसत पत्रकार परिषदेला सामोरं गेला.

यूरो कप २०२० स्पर्धेत ‘ग्रुप ऑफ डेथ’ अशी ओळख असलेल्या ‘फ’ गटात हंगेरीविरोधात होणाऱ्या सामन्याआधी रोनाल्डो पत्रकार परिषदेसाठी आला होता. यावेळी आपल्यासमोर कोका कोलाच्या दोन बाटल्या ठेवल्याचं त्याने पाहिलं. त्याने त्या बाटल्या बाजूला केल्या आणि तिथे असलेली पाण्याची बाटली हातात घेऊन ‘पाणी’ असं म्हणत एकाप्रकारे पाणी पिण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं.

यूरो कप २०२०: इटलीची बाद फेरीत धडक; स्वित्झर्लंडला ३-० ने केलं पराभूत

रोनाल्डोची ही एक कृती कोका कोला कंपनीला मोठी महागात पडली असून शेअर्स १.६ टक्क्यांनी खाली घसरले आणि तब्बल चार बिलियन डॉलर्सचा तोटा सहन करावा लागला. कंपनीची किंमत २४२ बिलियन डॉलर्सवरुन २३८ वर आली.