यूरो कप २०२० स्पर्धेतील तिसऱ्या सामना डेन्मार्क आणि फिनलँडमध्ये सुरु असताना फुटबॉलपटू ख्रिश्चियन एरिक्सन मैदानात कोसळला आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. घटनेनंतर डेन्मार्कच्या खेळाडूंनी क्षणाचाही विचार न करता त्याच्याकडे धाव घेतली. आपला संघ मित्राला काय झालं? याबाबत त्यांच्या मनात धाकधूक सुरु होती. खेळाडूंनी तात्काळ त्याच्याभोवती रिंगण करून त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मैदानात उपस्थित असलेली वैद्यकीय टीम तिथे पोहोचली. त्यांनी ख्रिश्चियनला तपासलं आणि तात्काळ रुग्णालयात हलवलं.

या घटनेमुळे घरी बसून सामना बघणाऱ्या प्रत्येकालाच धक्का बसला. यूरो कप समितीने सामना स्थगित केल्याने चाहत्यांची चिंता वाढली. त्यामुळे जगभरातून तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करण्यात आली. मुंबई इंडियन्सनेही त्याची प्रकृती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली. “ख्रिश्चियन एरिक्सन, खंबीर राहा. आम्ही केलेली प्रार्थना तु आणि तुझ्या कुटुंबियांसोबत आहे.” असं ट्वीट मुंबई इंडियन्सने अधिकृत ट्विटर हँडलवरून केलं आहे. मुंबई इंडियन्सचं हे ट्वीट व्हायरल होत आहे.


दरम्यान डेन्मार्कची पहिल्या सत्रात पकड दिसली. जास्तीत जास्त वेळ फुटबॉल स्वत:जवळ ठेवण्यात त्यांना यश आले. २३२ वेळा त्यांनी आपल्या खेळाडूंकडे फुटबॉल पास केला. तर फिनलँडच्या संघाने १४१ वेळा फुटबॉल पास केला. डेन्मार्कच्या संघाला ६ कॉर्नर शूटआउट मिळाले. मात्र या संधीचे गोलमध्ये रुपांतर करण्यास त्यांना अपयश आले.

मुरेच्या गोलमुळं वेल्सचं कमबॅक, स्वित्झर्लंडविरुद्धचा सामना सुटला बरोबरीत

साधारणपणे दर चार वर्षांनी खेळली जाणारी ही स्पर्धा गतवर्षी होणे अपेक्षित होते. मात्र करोना साथीच्या पार्श्वभूमीवर २०२१मध्ये युरो कप खेळवण्याचे ठरवण्यात आले. त्यातच प्रेक्षकांनाही मर्यादित संख्येत स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येत आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या तणावापूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर किमान पुढील एक महिना तरी क्रीडाप्रेमींना फुटबॉलचा रोमांच अनुभवायला मिळणार आहे.  ११ जुलैपर्यंत एकूण २४ संघांत खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेला ‘फिफा’ विश्वचषकाप्रमाणेच महत्त्व आहे.