यूरो कप २०२० स्पर्धा गेल्या वर्षी करोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर या स्पर्धेचं यावर्षी यशस्वी आयोजन करण्यात आलं. मात्र तत्पूर्वी या स्पर्धेत अनेक घडामोडी घडल्या. या घडामोडींमुळे यूरो कप स्पर्धा चांगलीच चर्चेत राहिली. यूरो कप स्पर्धेच्या सुरुवातीला काही खेळाडूंना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे ही स्पर्धा पुढे कशी पार पडेल? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला होता. मात्र ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. महिनाभर चालणाऱ्या स्पर्धेत एकूण २४ संघ सहभागी झाले होते आणि आज या स्पर्धेतील ५१ वा सामना खेळला जात आहे. इंग्लंड विरुद्ध इटली असा अंतिम सामना रंगत आहे.

स्पेन आणि स्वीडनच्या खेळाडूंना करोनाची लागण

स्पर्धा सुरु होण्यापूर्वी स्पेन आणि स्वीडनच्या प्रत्येकी दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली होती. यानंतर संघ प्रशासनानं स्पेनच्या सर्व खेळाडूंचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. स्पेन संघातील सरजिओ बसक्वेट आणि डिआगो लोरन्टे या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.

डेन्मार्कचा फुटबॉलपटू मैदानात कोसळला

युरो कप २०२०मध्ये डेन्मार्क विरुद्ध फिनलँड यांच्यात सामना सुरु असताना एक धक्कादायक घटना घडली. डेन्मार्कचा फुटबॉलपटू ख्रिश्चियन एरिक्सन मैदानात कोसळल्यानंतर सामना काही काळ स्थगित करण्यात आला. हा प्रसंग घडला तेव्हा पहिला सत्रातील खेळ संपला होता. हा सामना डेन्मार्कने १-० ने गमावला. एरिक्सनची प्रकृती आता बरी आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विक्रम

पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने साखळी फेरीत ५ गोल झळकावले. या गोलसह त्याने आंतराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक गोल करणाऱ्या इराणचा माजी स्ट्रायकर अली डेई याच्याशी बरोबरी साधली. रोनाल्डोने सलग ५ यूरो चषकात गोल करण्याची किमया साधली आहे. त्याने २००४, २००८, २०१२ आणि २०१६ या यूरो स्पर्धेत गोल झळकावले आहेत. ५ यूरो कप स्पर्धेत रोनाल्डोने एकूण १४ गोल झळकावले आहेत.

रोनाल्डोच्या कृतीमुळे कोका कोलाला फटका

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डो एका पत्रकार परिषदेसाठी आला होता. यावेळी आपल्यासमोर कोका कोलाच्या दोन बाटल्या ठेवल्याचं त्याने पाहिलं. त्याने त्या बाटल्या बाजूला केल्या आणि तिथे असलेली पाण्याची बाटली हातात घेऊन ‘पाणी’ असं म्हणत एकाप्रकारे पाणी पिण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं.रोनाल्डोची ही एक कृती कोका कोला कंपनीला मोठी महागात पडली असून शेअर्स १.६ टक्क्यांनी खाली घसरले आणि तब्बल चार बिलियन डॉलर्सचा तोटा सहन करावा लागला होता.

रोनाल्डोनंतर इटलीच्या लोकेटेलीने बाटल्या हटवल्या

इटलीच्या लोकेटेलीने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन गोल केले. त्याला या कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आला. यासाठी सामन्यानंतर एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या पत्रकार परिषदेत लोकेटेली समोर दोन कोका कोलाच्या बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या. मात्र पत्रकार परिषदेला बसण्यापूर्वी त्याच्या हे लक्षात आलं आणि त्याने बाटल्या हटवल्या.

फ्रान्सच्या फुटबॉलपटूने गिरवला रोनाल्डोचा कित्ता

रोनाल्डोनंतर फ्रान्सचा मिडफिल्डर पॉल पोगबाने एका पत्रकार परिषदेदरम्यान टेबलावर ठेवलेली Heineken बियरची बाटली काढली आणि खाली ठेवली. यूरो कप २०२० स्पर्धेसाठी कोका कोला आणि Heineken अधिकृत प्रायोजक आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या या कृत्यामुळे आयोजकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं होतं.

चेक रिपब्लिकच्या खेळाडूचा ‘खतरनाक’ गोल, गोलकीपरच घुसला जाळ्यात!

चेक रिपब्लिकच्या चिकने स्कॉटलँडविरुद्ध ५२व्या मिनिटाला नोंदवलेला गोल जबरदस्त ठरला. मैदानाच्या अर्ध्या म्हणजे ४९.७ मीटर यार्डातून त्याने हा गोल केला. चिकने मारलेला फटका स्कॉटलंड संघाचा गोलरक्षक डी मार्शलने अडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र तो पुढे आल्यामुळे त्याला हा गोल वाचवता आला नाही. मागे जाऊन गोल वाचवण्याच्या नादात मार्शल जाळ्यात घुसला.

डेन्मार्कच्या पॉलसेनचा जलद गोल

डेन्मार्कच्या युसूफ पॉलसेननं बेल्जियम विरुद्धच्या सामन्यात यूरो चषक २०२० स्पर्धेतला सर्वात जलद गोल झळकावला. हा गोल सामना सुरु झाल्यानंतर १ मिनिटं आणि ३९ सेकंद झाली असताना झळकावला. या गोलनंतर जलद गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत डेन्मार्कच्या युसूफ पॉलसेनला स्थान मिळालं. या यादीत रशियाच्या दीमित्री किरीचेनको याचं नाव आघाडीवर आहे.

डेन्मार्कच्या गोलकिपरवर लेझर लाईट मारल्याने संताप

उपांत्य फेरीत डेन्मार्क विरुद्धच्या सामन्यात हॅरी केननं निर्णायक गोल झळकावत इंग्लंडला विजय मिळवून दिला. १०४ व्या मिनिटाला हॅरीनं हा गोल झळकावला. मात्र हा गोल झळकावण्यापूर्वी डेन्मार्कच्या गोलकिपरवर लेझर लाईट मारल्याने क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. पेनल्टी दिल्याने डेन्मार्कचा गोलकिपर कॅस्पर श्मायकल गोल अडवण्यासाठी सज्ज होता. मात्र प्रेक्षकांमधून कुणीतरी त्याच्या चेहऱ्यावर हिरव्या रंगाचा लेझर लाईट मारला.