इंग्लंड विरुद्ध भारत पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी आहे. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात आघाडी घेण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न आहे. असं असलं तरी काही भारतीय खेळाडूंना अजूनही सूर गवसला नसल्याचं दिसत आहे. फलंदाजीसाठी तिसऱ्या क्रमांकापासून सहाव्या क्रमाकांवर येणाऱ्या फलंदाजांना कामगिरीत सुधारणा करणं आवश्यक आहे. केएल राहुल आणि रोहित शर्मा चांगली सुरुवात करून देतात. मात्र त्यानंतर फलंदाजी ढासळते, असं पाठच्या कसोटी सामन्यातून दिसून आलं आहे. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरले आहेत. विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा मागच्या दोन वर्षात कसोटी शतक झळकावण्यात अपयशी ठरले आहेत. अजिंक्य रहाणे याने या आधी डिसेंबर २०२० मध्ये शतक झळकावलं होतं. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेचा कामगिरी साजेशी नाही. त्यामुळे त्याला संघातून वगळावं अशी चर्चा सुरु आहे. मात्र असं असलं तरी माजी क्रिकेटपटू अजित आगरकर याने चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांची पाठराखण केली आहे.

“टीका हा खेळाडूंच्या कारकिर्दीचा भाग आहे. जेव्हा तुम्ही चांगलं करता तेव्हा तुम्हाला शाबासकी मिळते. मात्र जेव्हा कामगिरी साजेशी होत नाही तेव्हा मात्र टीकेला सामोरं जावं लागतं. पुजारा ८० पेक्षा जास्त कसोटी खेळला आहे. त्याला सल्ल्याची गरज नाही. त्याने जवळपास ६ हजार धावा केल्या आहेत. तो एक प्रतिभावंत खेळाडू आहे”, असं अजित अगरकरने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

Ind VS Eng 4th Test: लंडनमधील ओवल मैदान भारतासाठी कसं आहे?; गेल्या ५० वर्षात…!

“अजिंक्य रहाणे एक चांगला खेळाडू आहे. त्याने एका मालिकेचं परदेशात नेतृत्त्व केलं आहे. तेही तीन कसीटी सामन्यांमध्ये. त्यात त्याने शतक झळकावलं होतं. ते महत्वाचं शतक होतं. खरं तर ते विजयी शतक होतं. जबाबदारी काही लोकांना नक्कीच मदत करते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. ऑस्ट्रेलियात जिंकणं खूप कठीण आहे. रहाणेनं चांगली कामगिरी केली आहे. अजिंक्य आता धावा करण्यासाठी धडपड करत आहे. दुसऱ्या कसोटीतील लॉर्ड्सवरील अर्धशतक नक्कीच त्याला बळ देईल. तो एक अनुभवी खेळाडू आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे कठीण दौरे आहेत. त्यासाठी तुमच्या संघात अनुभवी खेळाडू असणं आवश्यक आहे. आगामी सामन्यात तो चांगली कामगिरी करेल.”, असं सांगत अजित अगरकरने अजिंक्य रहाणेची पाठराखण केली.