पाकिस्तान हॉकी फेडरेशन सध्या प्रचंड आर्थिक संकटात सापडलेली आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेने आयोजित केलेल्या, हॉकी प्रो-लिग स्पर्धेत पाकिस्तानने ऐनवेळी माघार घेतली. संघटनेच्या नियमांचं पालन न केल्यामुळे, आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेने पाकिस्तान हॉकी फेडरेशनला १ लाख ७० हजार युरोजचा दंड ठोठावला. मात्र आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तान हॉकी फेडरेशनने इतका मोठा दंड भरणं आम्हाला शक्य नसल्याचं कळवलं आहे.

आंतरराष्ट्रीय संघटनेने ठोठवलेल्या दंडाच्या बातमीला पाकिस्तान हॉकी फेडरेशनने दुजोरा दिला आहे. पाकिस्तान हॉकी फेडरेशनचे सचिव शाहबाज अहमद यांनी, हा दंड हप्त्यांमध्ये भरण्याची मूभा आंतरराष्ट्रीय संघटनेकडे मागितली आहे.

“पाकिस्तान हॉकी फेडरेशनकडे सध्या संघ सामन्यांना पाठवण्याइतकेही पैसे नाहीयेत. अशी परिस्थिती असताना आम्ही दंड कुठून भरणार?? सध्या पाकिस्तान हॉकीमध्ये प्रचंड आर्थिक तणाव सुरु आहे, ही परिस्थिती मी आंतरराष्ट्रीय संघटनेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सध्याच्या घडीला संघटनेला दंड ठोठावण्यापेक्षा आम्हाला मदतीची अपेक्षा आहे.” शाहबाज पत्रकारांशी बोलत होते.

पाकिस्तान हॉकी फेडरेशनवर आंतरराष्ट्रीय संघटनेने अद्याप बंदीची कारवाई केली नसल्यामुळे, पाकिस्तान संघटनेचे पदाधिकारी निधी जमावण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र २० जूनपर्यंत दंड न भरल्यास दंडाची रक्कम दुप्पट केली जाईल असा इशारा आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने दिला आहे. त्यामुळे आगामी काळात पाकिस्तान हॉकी फेडरेशन या प्रश्नावर कसा तोडगा काढते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.