फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने बार्सिलोनाला अलविदा केल्यानंतर आता तो पॅरिस सेंट-जर्मेन क्लबकडून खेळणार आहे. ३४ वर्षीय मेस्सीचा तीन दिवसांपूर्वीच बार्सिलोनासोबतचा करार संपुष्टात आला आहे. लवकरच पॅरीसमध्ये पीएसजीसोबत करार करणार आहे. पीएसजीकडून त्याला वर्षाला २५७ कोटी रुपये मिळण्याची आशा आहे. हा करार दोन वर्षांचा असून २०२४ पर्यंत मुदत वाढवण्याची शक्यता आहे. बार्सिलोना सोडल्यानंतर मेस्सीकडे दोन पर्याय होते.मात्र त्याने पीएसजीसोबत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मेस्सीच्या वडिलांनी पीएसजीसोबत खेळणार असल्याचं सांगितलं आहे.

सेंट-जर्मेन संघात ब्राझीलचा नेयमार, फ्रान्सचा किलियान एम्बापे, अर्जेटिनाचा एंजल डी मारिया यांसारख्या प्रतिभावान खेळाडूंचा समावेश आहे. त्याशिवाय काही महिन्यांपूर्वीच त्यांनी स्पेनचा सर्जिओ रामोस आणि युरो चषक विजेत्या इटलीचा गोलरक्षक डोनारुमा यांनाही करारबद्ध केले. सेंट-जर्मेन संघ फ्रान्समधील लीग-१ चषक फुटबॉल स्पर्धेत खेळतो.

मेस्सी आणि बार्सिलोना

मेस्सी १३ वर्षांचा असल्यापासून बार्लिसलोना क्लबसोबत खेळत आहे. चार वर्षे प्रशिक्षण घेतल्यानंतर मेस्सीने बार्सिलोना वरिष्ठ संघासोबत खेळण्यास सुरुवात केली होती. त्याने १७ वर्षात ३५ किताब आपल्या नावे केले आहेत. त्याचबरोबर बार्सिलोना क्लबकडून खेळताना त्याने ७७८ सामन्यात एकूण ६७२ गोल केले आहेत. पाचवेळा फीफा प्लेअर ऑफ द इअर असलेल्या मेस्सीने २०१७ या वर्षी नव्याने करार केला होता. हा करार ३० जून २०२१ पर्यंत वाढवण्यात आला होता. बार्सिलोनाने तेव्हा जवळपास ५ हजार ४०० कोटींचा करार केला होता.

मागील महिन्यात जिंकली कोपा अमेरिका स्पर्धा

मागील महिन्याच झालेल्या कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मेस्सीच्या नेतृत्वातील अर्जेटिंनाने ब्राझीलचा पराभव करत विजेतेपद जिंकले. यासोबतच लिओनेल मेस्सीचे आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्याचे स्वप्नही पूर्ण झाले आहे. मार्काना स्टेडियममध्ये अर्जेटिना आणि ब्राझिल या दोन बलाढय़ संघांमध्ये होणाऱ्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लिओनेल मेस्सी आणि नेयमार आमनेसामने येणार असल्यामुळे या लढतीची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अर्जेंटिनाने १-० ने ब्राझीलचा पराभव करत विजेतेपद मिळवले.