२०११मध्ये भारतीय क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेवर नाव कोरले. दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू गॅरी कर्स्टन यांनी तत्कालिन टीम इंडियाला मार्गदर्शन केले होते. आता हा विश्वविजेता प्रशिक्षक नेदरलँड्स क्रिकेट संघाला प्रशिक्षण देणार आहे. कर्स्टन यांची नेदरलँड्सच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नेमणूक केली आहे.

नेदरलँड्स तीन एकदिवसीय सामन्यांसाठी आयर्लंडचा दौरा करणार आहे. आयर्लंविरुद्धचे सामने आयसीसी सीडब्ल्यूसी सुपर लीग मालिकेचा भाग आहेत. रायन कॅम्पबेल हे नेदरलँड्सचे मुख्य प्रशिक्षक आहेत, तर जेम्स हिल्डीच आणि कर्स्टन हे सहायक प्रशिक्षक आहेत.

कर्स्टन हे २००७ ते २०११पर्यंत भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. जून २०११मध्ये त्यांची दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती, परंतु ऑगस्ट २०१३मध्ये त्यांनी पदभार सोडला. मागील वर्षी सप्टेंबर २०२०मध्ये माजी मुख्य प्रशिक्षक डीन जोन्स यांच्या निधनानंतर, कर्स्टन पाकिस्तान सुपर लीगची फ्रेंचायझी कराची किंग्जचे मुख्य प्रशिक्षक असतील अशीही बातमी समोर आली होती, पण या बातमीत काही तथ्य नव्हते.

हेही वाचा – WTC स्पर्धेचा अंतिम सामना ड्रॉ झाला किंवा अनिर्णित सुटला, तर कोण असेल विजेता?

वर्ल्डकप सुपर लीगच्या पॉईंट टेबलमध्ये बांगलादेशचा संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. बांगलादेशने भारत, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, विंडीज आणि इंग्लंड या सहा संघांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. आयसीसीने गेल्या वर्षी वर्ल्डकप सुपर लीगची सुरुवात केली होती. यात १३ संघांना स्थान देण्यात आले आहे. २०२३मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात यातील अव्वल आठ संघ पात्र ठरतील. सर्व संघांना ८ मालिका खेळायच्या आहेत. त्यापैकी ४ मालिका घरच्या मैदानावर तर उर्वरित ४ विदेशी खेळपट्टीवर खेळल्या जातील.

प्रत्येक मालिकेत तीन सामने होतील. अशा प्रकारे संघाला एकूण २४ सामने खेळावे लागतील. सध्याच्या १३ संघांपैकी फक्त नेदरलँड्सला अद्याप एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. बांगलादेश संघाने आतापर्यंत खेळलेल्या ८ पैकी ५ सामने जिंकले आहेत. ते ५० गुणांसह अव्वल स्थानी आहेत. इंग्लंडने ९ पैकी ४ सामने जिंकले आहेत. इंग्लिश संघ ४० गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे. आयर्लंडचे ६ सामन्यांत १० गुण आहेत. आयर्लंड दहाव्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – एकेकाळी विराटचा साथीदार असणारा खेळाडू म्हणतो, “फक्त ऋषभ पंतसाठी कसोटी क्रिकेट पाहतो”