माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण बंगाल क्रिकेट संघाचा फलंदाजी सल्लागार म्हणून कायम राहणार आहे, तर लक्ष्मी रतन शुक्लाची २३ वर्षांखालील संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राजकारणात दाखल झाल्यानंतर सहा वर्षांनी शुक्ला क्रिकेटमध्ये परतला आहे. बंगालचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू असलेल्या शुक्लाने तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी २०१६मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

शुक्ला हावडा (उत्तर) इथून आमदार झाला आणि नंतर त्याने क्रीडामंत्री म्हणून काम पाहिले, परंतु या वर्षाच्या सुरुवातीला त्याने या पदाचा राजीनामा दिला. एकत्र काम करूया. मी काम सुरू होण्याची वाट पाहत आहे, असे शुक्लाने या नियुक्तीपूर्वी सांगितले.

 

नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने अनुभवी अरुण लाल यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून, तर सोरिश लाहिरी यांना वरिष्ठ संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून बढती दिली आहे. बंगालचा माजी वेगवान गोलंदाज शिवशंकर पॉल याची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा – टेनिस..क्रिकेट…पुन्हा टेनिस..! वाचा विम्बल्डनच्या ‘सम्राज्ञी’चा प्रवास

लक्ष्मी रतन शुक्लाचा क्रिकेटप्रवास

४० वर्षीय शुक्लाने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. ३ सामन्यात त्याने १८ धावा केल्या, तसेच एक विकेटही घेतली. बंगालकडून त्याने १३७ प्रथम श्रेणी सामन्यात ६२१७ धावा केल्या आणि १७२ बळी घेतले. १४२ लिस्ट-ए सामन्यात त्याने २९९७ धावा केल्या आणि १४३ बळी घेतले. ८० टी-२० सामन्यात त्याने ९९१ धावा केल्या आणि ४७ विकेट्स घेतल्या.