कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या आयपीएल म्हणजेच इंडियन प्रिमीअर लिग स्पर्धेच्या कक्षा रुंदावण्याच्या तयारीत आहेत. टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, अदानी उद्योग समुह, RPG-संजीव गोएंका उद्योग समुह आणि टाटा उद्योगसमुह आयपीएलमध्ये नवीन संघ विकत घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आगामी काळात आयपीएल स्पर्धेत ८ संघांऐवजी १० संघ खेळताना दिसण्याची शक्यता आहे. अदानी उद्योग समुह अहमदाबा, संजीव गोएंका सुमह पुणे तर टाटा उद्योग समुह रांची किंवा जमशेदपूर संघासाठी बोली लावणार असल्याचं कळतंय. मात्र आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल आणि बीसीसीआय यापैकी दोन संघांनाच मान्यता देणार असल्याचं कळतंय.

२०११ साली आयपीएल स्पर्धेत अशाचपद्धतीने दोन नवीन संघ उतरवण्यात आले होते. मात्र त्यावेळी बीसीसीआयचा हा प्रयोग फसला होता. ८ वर्षांनी देशातील प्रमुख उद्योगसुमहांनी नवीन संघांसाठी बोली लावण्याची तयारी दाखवल्यामुळे आगामी काळात दोन नवीन संघ स्पर्धेत दिसू शकतात. “आराखडा तयार झाला आहे, आयपीएलच्या कक्षा रुंदावणार ही गोष्ट नक्की आहे. आता फक्त निविदा प्रक्रिया कशी पार पाडली जाते हे पहावं लागणार आहे. मात्र आगामी आयपीएल हंगामाआधी या सर्व गोष्टी सुरळीत पार पडतील.” या घडामोडींशी संदर्भात एका अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाला माहिती दिली.

संघमालक आणि बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांच्यामध्ये गेल्या आठवड्यात लंडनमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीत नवीन संघ आयपीएलमधघ्ये आल्यास बीसीसीआयला याचा फायदा होईल यावर एकमत झालं आहे. मात्र दोन नवीन संघासाठी अधिकृत पद्धतीने निवीदा काढून बोली लावण्याची प्रक्रिया करण्यास काही कालावधी जाऊ शकतो. २०२१ सालापर्यंत दोन नवीन संघ आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतात, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. राहुल जोहरी यांनीही बैठकीच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, मात्र याचा तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणी नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.