करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. सुमारे दोन लाखांहून अधिक लोकांना करोनाचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडास्पर्धा रद्द झाल्या आहेत. भारतातील आघाडीची टी २० लीग IPL चे आयोजनदेखील लांबणीवर ढकलण्यात आले आहे. त्यातच IPL करारासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडू विराटला स्लेजिंग करायला घाबरतात, असा आरोप ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने केला होता. त्याला चेन्नई सुपर किंग्जचा फिरकीपटू हरभजन सिंग याने चोख प्रत्युत्तर दिले.

गांगुली ओरडून ओरडून सांगत होता, पण कैफने ऐकलंच नाही… वाचा ‘तो’ किस्सा

विराट कोहलीचा कर्णधार म्हणून मैदानातला वावर आक्रमक असतो. अनेकदा मैदानात त्याचे प्रतिस्पर्धी संघातल्या खेळाडूशी खटके उडताना आपण पाहिले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाचे खेळाडू हे एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्लेजिंगसाठी प्रसिद्ध मानले जायचे. मात्र आयपीएल नंतर अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडू करारासाठी विराट कोहलीला डिवचायला घाबरायचे, असा आरोप मायकल क्लार्कने बिग स्पोर्ट्स ब्रेकफास्ट या स्थानिक वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना केला होता.

दुष्काळात तेरावा… ऑलिम्पिक समितीच्या सदस्यच निघाला करोना पॉझिटिव्ह

“क्रिकेटमध्ये पैशाचा विषय आला की भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर किती मोठा आहे हे सर्वांना माहिती आहे. याच कारणामुळे भारताच्या दबावासमोर इतर खेळाडू बळी पडायचे. विराटने मला RCB मध्ये निवडावं, जेणेकरुन माझे पुढचे काही महिने चांगले जातील, असे अनेकांनी बोललेलं मी ऐकलं आहे. या आधी ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा मैदानावरचा दबदबा होता, तो आता राहिला नाही”, असे क्लार्क म्हणाला.

तेव्हा मी रात्रभर ढसाढसा रडलो – विराट कोहली

त्यावर हरभजनने त्याला सडेतोड उत्तर दिले. “IPL मध्ये खेळाडूंना करारबद्ध करायचं काम विराट करत नाही. जर तुम्ही उत्तम कामगिरी करत असाल, तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. डेव्हिड वॉर्नर किंवा स्टीव्ह स्मिथसारख्या प्रतिभावंत खेळाडूंना तुम्ही कसं काय रोखू शकता? अशा खेळाडूंना त्यांच्या करारासाठी घाबरून राहण्याची काहीच गरज नाही. क्लार्कला जर वाटतं असेल की करारासाठी काही खेळाडूंना विराटला दबकून राहावं लागतंय, तर त्याने ते कोण खेळाडू आहेत त्यांची नावं सांगायला हवीत. सरसकट सगळ्याचा संबंध विराटशी लावणं बरोबर नाही”, असे हरभजनने आयएएनएस वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.