भारतीय संघाचा धमाकेदार अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या हा काही काळ दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. पण नुकतेच त्याने क्रिकेटच्या मैदानात दमदार पुनरागमन केले. हार्दिक पांड्याने डॉ. डी वाय पाटील टी 20 स्पर्धेत खेळताना तुफानी खेळी केली. सध्या तो डॉ डी वाय पाटील टी २० स्पर्धेत रिलायन्स वन संघाकडून खेळत आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात त्याने अवघ्या ३७ चेंडूत दमदार शतक झळकावले. या खेळीत त्याने तब्बल १० षटकार आणि ७ चौकारांची आतषबाजी केली.

हा पाहा व्हिडीओ –

सध्या सुरू असलेल्या डॉ. डी वाय पाटील टी २० स्पर्धेत कॅग संघाविरूद्ध रिलायन्स वन संघाचा सामना रंगला होता. त्या सामन्यात हार्दिकने तुफान फटकेबाजी केली. रिलायन्स वन संघाकडून खेळताना पांड्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत सामन्याचा नूरच बदलला. सुरूवातीपासूनच प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर आक्रमण करत हार्दिक पांड्याने जोरदार फलंदाजी केली. हार्दिकच्या खेळीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने केवळ २५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतर तर तो अधिकच आक्रमक झाला आणि त्याने पुढील ५ धावा केवळ १२ चेंडूत ठोकल्या.

पाहा हार्दिक पांड्याच्या खेळीची झलक

हार्दिक पांड्या दुखापतीमुळे गेले ६-७ महिने क्रिकेटपासून दूर होता. गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत हार्दिकच्या कंबरेला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर इंग्लंडमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. पण तरीदेखील हार्दिकला ‘कमबॅक’ करण्याची संधी मिळाली नव्हती. भारतीय संघात त्याला स्थान देण्यात आले नव्हते. आता मात्र हार्दिक पूर्णपणे तंदुरूस्त आहे. त्यामुळे लवकरच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पुनरागमन करताना दिसण्याची शक्यता आहे. दरम्यान, IPL 2020 च्या तोंडावर हार्दिकचा तुफानी कमबॅक ही भारताची जमेची बाजू मानली जात आहे.