भारतीय हॉकी संघाचे दिग्गज माजी खेळाडू केशव चंद्र दत्त यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. स्वातंत्र्यानंतर झालेल्या १९४८च्या ऑलिम्पिकमध्ये दत्त भारताच्या ऐतिहासिक विजयाचा भाग होते. लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने ग्रेट ब्रिटनला ४-० ने पराभूत केले होते.

१९४८च्या ऑलिम्पिकपूर्वी दत्त यांनी मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वात १९४७मध्ये पूर्व आफ्रिका दौरा केला होता. २९ डिसेंबर १९२५ला लाहोरमध्ये जन्मलेले दत्त हे १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्येही भारतीय संघाचे एक भाग होते. १९५०मध्ये कलकत्ता (आता कोलकाता) येथे गेल्यानंतर दत्त यांनी मोहन बागान क्लबचेही प्रतिनिधित्व केले.

हेही वाचा – “खरे तर आपण अल्लाहचे आहोत…”, दिलीप कुमार यांच्या निधनावर पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीची प्रतिक्रिया

 

 

“दत्त यांच्या निधनाने आम्ही सर्वजण दु: खी झालो आहोत. १९४८ आणि १९५२च्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या हॉकी संघाचे ते एकमेव सदस्य राहिले होते आणि आज त्यांचे निधन झाले. एका युगाचा अंत झाला आहे. स्वातंत्र्योत्तर ऑलिंपिकमधील त्यांचे आश्चर्यकारक किस्से ऐकून आम्ही सर्वजण मोठे झालो आहोत. ते देशातील आगामी हॉकी खेळाडूंसाठी प्रेरणास्त्रोत असतील. हॉकी इंडियाला बातमीने फार दु: ख झाले आहे. महासंघाच्या वतीने मी त्यांच्या कुटूंबीयांबद्दल शोक व्यक्त करतो”, असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्रो निंगोम्बाम यांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे.