ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते भारताचे महान हॉकीपटू आणि माजी कर्णधार बलबीर सिंग दोसांज (बलबीर सिनियर) यांचे प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या दोन आठवड्यापासून ते विविध प्रकारच्या आजारांशी दोन हात करत होते. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात त्यांना न्यूमोनियावर तब्बल १०८ दिवस उपचार घेतल्यानंतर रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेतेपद मिळवलेल्या बलबीर सिंग यांना ८ मे रोजी मोहलीच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते व्हेंटिलेटरवर होते. मात्र अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
Hockey India extends its condolences to fans, friends and family of the 3-time Olympic Gold Medalist and Padma Shri Awardee, Balbir Singh Sr.#IndiaKaGame #RIP @BalbirSenior
— Hockey India (@TheHockeyIndia) May 25, 2020
भारतीय हॉकी संघात आक्रमण फळीत (फॉरवर्ड) खेळणारे बलबीर सिंग हे एक प्रतिभावंत क्रीडापटू होते. १९४८, १९५२ आणि १९५६ असे सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघात त्यांचा समावेश होता. भारतीय संघ हॉकी विश्वचषक स्पर्धेत सर्वप्रथम त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सहभागी झाला होता. १९७५ साली मलेशियात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावली. बलबीर सिंग यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पुरूष हॉकीच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम अजूनही बलबीर सिंग यांच्याच नावे आहे. १९५२ साली हेलसिंकी येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये अंतिम सामन्यात भारताने नेदरलँड्सला ६-१ अशी धूळ चारली होती. त्यात पाच गोल बलबीर सिंग यांचे होते. त्यांनी भारतीय हॉकी संघाचे कर्णधारपददेखील भूषवले. १९५६ साली मेलबर्न ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताने त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण स्पर्धेत ३८ गोल केले आणि विशेष म्हणजे प्रतिस्पर्धा संघाला भारताविरूद्ध एकही गोलची कमाई करता आली नाही.