२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा हिस्सा असलेल्या दिनेश कार्तिकने यानंतर संघातलं आपलं स्थान गमावलं. मात्र ३४ वर्षीय दिनेशने अजुनही भारतीय संघात स्थान मिळवण्याबद्दलची आशा सोडलेली नाहीये. २०२० साली भारतीय संघ ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक खेळणार आहे. त्यातचं ऋषभ पंतची खराब कामगिरी चर्चेत असताना दिनेश कार्तिकने आपल्याला संधी मिळाल्यास आपण बदल घडवू शकतो असं म्हटलं आहे.

अवश्य वाचा – मिळालेल्या संधीचं सोनं करायचं आहे, मी विश्वचषकाची काळजी करत नाही – लोकेश राहुल

“संघात मला फिनीशरची भूमिका नेहमी आवडत आलेली आहे. एकदा संधी मिळाल्यास, मी स्वतःला नक्कीच एकदा सिद्ध करुन दाखवेन.” चेन्नईत एका खासगी कार्यक्रमाला उपस्थित असताना दिनेश कार्तिक पत्रकारांशी बोलत होता. टीम इंडियातलं स्थान गमावल्यानंतर दिनेश कार्तिकने स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. विजय हजारे करंडक स्पर्धेत दिनेशने ५९ च्या सरासरीने ४१८ धावा काढल्या होत्या. याचसोबत सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतही त्याची कामगिरी उल्लेखनीय होती.

“मी माझ्या नैसर्गिक खेळात कोणताही बदल करण्याचा प्रयत्नच केला नाही. माझ्यासाठी संघाला सामना जिंकवून देणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मग तो भारतीय संघ असो किंवा स्थानिक क्रिकेटमध्ये खेळताना तामिळनाडूचा संघ असो…प्रत्येकाला भारतीय संघात आपलं स्थान पक्क करायचं असतं, आणि मी देखील याला अपवाद नाहीये. संघात पुन्हा एकदा जागा मिळावी यासाठी मी प्रयत्नशील आहे.” दिनेश कार्तिकने आपली भूमिका स्पष्ट केली.