अंडर – 19 संघाचा कर्णधार विराट कोहलीला निवडसमितीत असताना मी निवडलं होतं, परंतु तामिळनाडू व चेन्नई सुपरकिंग्जच्या बद्रीनाथला घ्यावं असं कर्णधार महेंद्र सिंह ढोणीला वाटत होतं, त्यामुळे माझी गच्छन्ती करून श्रीकांतला निवडसमितीच्या अध्यक्षपदी नेमल्याचा गौप्यस्फोट दिलीप वेंगसरकर यांनी केला आहे. निवड समिती अध्यक्ष ही सर्वाधिक आव्हानात्मक जबाबदारी होती आणि त्यात कठोर निर्णय घेतल्याबद्दल या समितीतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याची खंत भारताचे माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी बोलून दाखविली. निमित्त होते मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रथमच देण्यात येणाऱ्या क्रीडा पत्रकार पुरस्कार वितरणाचे. माजी कसोटीपटू व यष्टिरक्षक फारुख इंजीनिअर हेदेखील यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पत्रकार भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमात दिव्य मराठीचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विनायक दळवी यांचा यावेळी महेश बोभाटे स्मृती क्रीडा पत्रकार पुरस्कार तर युवा पत्रकार म्हणून पुढारीचे क्रीडा पत्रकार संदीप कदम यांचा आत्माराम मोरे स्मृती पुरस्कार देऊन यावेळी गौरव करण्यात आला. दळवी यांना सन्मानचिन्ह आणि १० हजार रु. तर संदीप कदम यांना सन्मानचिन्ह आणि ७ हजार रु. देऊन सन्मानित करण्यात आले.

वेंगसरकर यावेळी म्हणाले की, दोन वर्षे भारतीय क्रिकेट निवड समितीचा अध्यक्ष होतो. ही जबाबदारी माझ्या कारकीर्दीतील सर्वाधिक आव्हानात्मक जबाबदारी होती. तेव्हा ऑस्ट्रेलियात उदयोन्मुख खेळाडूंची स्पर्धा होत असे. त्यात भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड असे संघ खेळत. त्यात आम्ही २३ वर्षांखालील संघ घेऊन जायचे ठरवले. तेव्हा १९ वर्षांखालील विश्वचषकही जिंकलो होतो. त्या संघाचा कर्णधार विराट कोहलीला आम्ही त्या स्पर्धेसाठी निवडले. त्यात विराटने १२३ धावांची नाबाद खेळी केली होती. विराटमध्ये निश्चितच भारतीय संघातून खेळायची क्षमता आहे अशी आमची खात्री पटली होती. म्हणून विराटची निवड श्रीलंकेच्या पुढील दौऱ्यावर जात असलेल्या भारतीय संघात करण्याचे आम्ही ठरवले. मात्र संघप्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी तेव्हा सांगितले की, आम्ही त्याला खेळताना पाहिलेले नाही. त्यामुळे त्याला संघात घेऊ नये. पण हे सगळे त्या संघात तामिळनाडूच्या बद्रिनाथला संघात घेण्यासाठी चालले होते, हे लक्षात येत होतं. कारण बद्रिनाथ चेन्नई सुपर किंग्जला खेळत होता आणि भारतीय क्रिकेट बोर्डाचे खजिनदार म्हणून एन. श्रीनिवासन होते जे तामिळनाडू क्रिकेट बोर्डाचेही अध्यक्ष होते.

मी विराटला संघात घेतल्यानंतर बद्रिनाथला बाहेर बसावे लागले. श्रीनिवासन यांनी त्याबद्दल मला जाब विचारला, तेव्हा विराटला संघात घेणे कसे आवश्यक होते हे मी सांगितले. पण ते तडकाफडकी के. श्रीकांतला घेऊन तत्कालिन बोर्ड अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे गेले आणि मला निवड समितीतून बाहेरचा रस्ता दाखविला. श्रीकांत हा त्यानंतर निवड समिती अध्यक्ष झाला होता.

वेंगसरकर आणि फारुख इंजीनिअर यांनी अशा अनेक किश्श्यांनी या सोहळ्यात रंगत भरली. सूत्रसंचालक अश्विन बापट यांनी या दोघांनाही बोलते केले. विशेष म्हणजे फारुख इंजीनिअर यांनी मराठीतून उपस्थितांशी संवाद साधला. खवय्येगिरी, मुंबई क्रिकेटची अवस्था, विंडीज दौऱ्यातील वेगवान गोलंदाजीचा सामना, चंद्रशेखर यांची गोलंदाजी, टी-२० क्रिकेट अशा विविध विषयांवर या मान्यवरांनी आपली दिलखुलास मते व्यक्त केली.