आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी गटांची घोषणा केली आहे. आज शुक्रवारी ओमानमध्ये गटात कोणकोणते संघ असणार, हे निश्चित करण्यात आले. विशेष म्हणजे, भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकाच गटात आहेत. दोघेही सुपर-१२च्या ग्रुप गट-२ मध्ये आहेत. २०१९च्या वनडे वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघ शेवटचे आमनेसामने आले होते. यात भारताने विजय मिळवला होता.

करोनामुळे टी-२० वर्ल्डकप १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान भारताऐवजी यूएई आणि ओमान येथे खेळला जाईल. ओमानमधील बैठकीत आयसीसीच्या अधिकाऱ्यांसह बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनीही भाग घेतला. टी-२० वर्ल्डकपचे सामन्याचे वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

 

 

 

ओमान आणि यूएई येथे खेळल्या जाणार्‍या या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत आठ पात्र संघ सहभागी होणार आहेत. यातील चार संघ सुपर १२ फेरी गाठतील. प्राथमिक फेरीतील आठ संघांमध्ये बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबरला होणार आहे.

हेही वाचा – “टीम इंडियात निवड होतेय तरी कशी?”, RCBच्या माजी क्रिकेटपटूचं विराटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

२०१६ नंतरचा हा पहिला टी-२० वर्ल्डकप असेल. त्यावेळी वेस्ट इंडिजने इंग्लंडला पराभूत करून विजेतेपद जिंकले होते. सुपर-१०च्या गटातील सामन्यात भारताने पाकिस्तानला ६ गडी राखून पराभूत केले. उपांत्य सामन्यात भारताला विंडीजकडून पराभवाला सामोरे जावे लागले.