भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सिडनी कसोटी सामन्यानंतर आयसीसीनं (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. मेलबर्न आणि सिडनी कसोटीत स्फोटक फलंदाजी करणारा भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतनं आयसीसी क्रमवारीत मोठी भरारी घेतली आहे. तर विराट कोहलीची एका अंकानं घसरण झाली आहे.

सिडनी कसोटीपूर्वी ऋषभ पंत आयसीसी कसोटी क्रमवारीत ४५ व्या स्थानावर होता. तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ३६ आणि दुसऱ्या डावात ९७ धावांची विस्फोटक खेळी केली आहे. या खेळीचा फायदा पंतला झाला आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार ऋषभ पंत २६ व्या क्रमांकावर पोहचला आहे. भारताच्या इतर फलंदाजीबाबत बोलायचं झाल्यास अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यांच्या क्रमारीत घसरण झाली आहे. विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावरुन तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. तर रहाणे सहाव्या क्रमांकावरुन सातव्या क्रमांकावर घसरला आहे. चेतेश्व पुजाराच्या क्रमवारीत दोन स्थानानी सुधारणा झाली आहे. पुजारा ताज्या क्रमवारीनुसार आठव्या स्थानावर विराजमान आहे. अव्वल दहा फलंदाजामध्ये तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर केन विल्यमसन असून दुसऱ्या स्थानावर स्टिव्ह स्मिथ आहे.

आणखी वाचा- लवकरच परतणार..! दुखापतग्रस्त भारतीय खेळाडूची पोस्ट

आणखी वाचा- दुखापत… दुखापत आणि दुखापतच; बुमराहनंतर मयांक, अश्विनही जायबंदी

गोलंदाजीच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराह आणि अश्विन यांना फटका बसला आहे. बुमराह नवव्या स्थानावरुन दहाव्या स्थानावर पोहचला आहे. तर अश्विन सातव्या स्थानावरुन नवव्या स्थानावर पोहचला आहे. जॉश हेजलवूडची तीन स्थानाची प्रगती झाली आहे. हेजलवूड सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये रविंद्र जाडेजा दुसऱ्या क्रमांकावर आहे.