वेस्ट इंडिजने भारताला पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८ गडी राखून धूळ चारली. शिमरॉन हेटमायर (१३९) आणि शे होप (१०२) यांनी ठोकलेल्या शतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजने मालिकेत विजयी सलामी दिली. सामन्यात विराट पूर्णपणे अपयशी ठरला, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे (ICC) च्या ताज्या क्रमवारीनुसार विराट कसोटी क्रिकेटमध्ये अव्वलस्थानी कायम आहे. ICC ने सोमवारी जागतिक कसोटी क्रमवारी जाहीर केली. त्यात कसोटी फलंदाजांच्या यादीत कर्णधार विराट कोहली आणि संघांच्या यादीत टीम इंडिया अव्वल स्थान कायम राखले. पण गोलंदाज जसप्रीत बुमराह मात्र दुखापतीमुळे सहाव्या स्थानी फेकला गेला आहे.

विराटने बांगलादेशविरूद्धच्या मालिकेत द्विशतक ठोकले. तसेच दिवस-रात्र कसोटीतदेखील शतक लगावले. त्यामुळे नव्या यादीनुसार त्याने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. कसोटीत ९२८ गुणांसह विराट अव्वल स्थानी कायम आहे. तर स्मिथ ९११ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (८६४), भारताचा चेतेश्वर पुजारा (७९१) आणि ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबूशेन (७८६) हे टॉप ५ मधील खेळाडू आहेत. मुंबईकर अजिंक्य रहाणे हा देखील ७५९ गुणांसह सहाव्या स्थानी कायम आहे.

गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराहला दुखापतीचा फटका क्रमवारीत बसला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेपासून तो क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे त्याची क्रमवारीत घसरण झाली असून तो सहाव्या स्थानी फेकला गेला आहे. यादीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स अव्वल आहे. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जाडेजा दुसऱ्या स्थानी कायम आहे. तसेच भारतही ३६० गुणांसह क्रमवारीत अव्वल आहे. दुसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियापेक्षा (२१६) भारत १४४ गुणांनी पुढे आहे.