महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती कधी स्विकारणार या प्रश्नावर गेले अनेक महिने चर्चा सुरु आहे. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर, धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाहीये. काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या वार्षिक करार यादीतही धोनीचं नाव वगळण्यात आलं. ज्यामुळे धोनी आता भारतीय संघात कधीच पुनरागमन करणार नाही अशा चर्चांनाही उधाण आलेलं होतं. अशातच संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीच्या निवृत्तीबद्दल महत्वाचं विधान केलं आहे.

आगामी आयपीएलचा हंगाम हा धोनीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या हंगामात त्याला त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आलं तर तो निवृत्ती घेऊ शकतो असे संकेत शास्त्री यांनी दिले आहेत. “धोनी स्वतःला चांगलं जाणून आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतानाही आपण १०० सामने खेळावेत हा विचार त्याने केला नाही. कुठं थांबायचं हे त्याला माहिती आहे. त्याने सरावाला सुरुवात केली आहे की नाही याची मला कल्पना नाही. पण आयपीएलनंतर चित्र स्पष्ट होईल. जर त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही तर तो थँक्यू व्हेरी मच म्हणेल”, एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री बोलत होते.

धोनीच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतकडे भारतीय संघाच यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. मात्र गेल्या काही मालिकांमधील त्याची खराब कामगिरी पाहता आता भारतीय संघ व्यवस्थापन दुसरा पर्याय शोधत आहे. याचाच एक भाग म्हणून गेल्या काही सामन्यातंमध्ये लोकेश राहुलला यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. त्यामुळे आगामी आयपीएल हंगामात धोनी कसा खेळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.