भारत आणि पाकिस्तान यांच्यात बिघडलेल्या राजकीय संबंधाचा फटका पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बसतोय. पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्तानला आपल्या आशिया चषकाच्या यजमानपदावर पाणी सोडावं लागलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी २० विश्वचषक २०२० या स्पर्धेच्या महिनाभर आधी आशिया कप २०२० खेळला जाणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. पण पाकिस्तानकडून या स्पर्धेचे यजमानपद काढून घेण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी आता बांगलादेश, श्रीलंका किंवा दुबई या पर्यायांचा विचार केला जात आहे.

बीसीसीआयच्या या भूमिकेनंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड BCCI ची कोंडी करण्याच्या तयारीत आहे. “आशिया चषकाचं यजमानपद कोणाकडे द्यायचं हा निर्णय आयसीसीचा नव्हे तर आशियाई क्रिकेट परिषदेचा आहे. सध्याच्या घडीला आम्ही आशिया चषकासाठी दोन पर्यायांचा विचार करत आहोत. जर भारताने या ठिकाणी येण्यास नकार दिला, तर पाकिस्तानही २०२१ साली भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात सहभागी होणार नाही.” पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वासिम खान यांनी डॉन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.

आशिया कप स्पर्धा टी २० प्रकारात खेळली जाणार आहे. टी २० विश्वचषक स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून आशिया कप स्पर्धा टी २० पद्धतीने खेळली जाणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंका संघाने टी-२० आणि कसोटी मालिका खेळली आहे. याव्यतिरीक्त बांगलादेशचा संघही पाकिस्तानात टी-२० मालिका खेळतो आहे, त्यामुळे आगामी काळात आशिया चषकाच्या आयोजनाबद्दल नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.