२०१७ सालात घरच्या मैदानावर तुल्यबळ संघांना पराभवाचं पाणी पाजल्यानंतर, नवीन वर्षात भारतीय संघाला पहिल्याच मालिकेत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. आफ्रिकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांची मालिका भारताने २-० अशी गमावलेली आहे. भारताच्या या पराभवामुळे क्रिकेट रसिक काहीसे नाराज असले, तरीही माजी खेळाडू बिशनसिंह बेदी यांना या पराभवात कोणतीही गोष्ट नवल वाटत नाहीये. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बेदी यांनी भारतीय संघाच्या नियोजनशून्य कारभारावर टीका केली.

“आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाण्याआधी भारतीय संघाने जरासाही सराव केलेला नाही. आपण जवळपास एक महिना दुबळया श्रीलंकेशी खेळण्यात वाया गेल्या. खरं सांगायला गेल्यास श्रीलंकेच्या दौऱ्याची भारताला गरज नव्हती, या कालावधीत आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ सराव करु शकला असता. आफ्रिकेतल्या खेळपट्ट्या या खेळण्यासाठी कठीण असतात ही बाब सर्वश्रुत आहे. भारतीय संघाने श्रीलंकेला त्यांच्या देशात जाऊन हरवलं, मग त्याच संघाबरोबर घरच्या मैदानावर कसोटी, वन-डे आणि टी-२० मालिका खेळून नेमकं काय साध्य होणार होतं? या ऐवजी भारतीय खेळाडूंनी स्थानिक रणजी सामन्यांमध्ये खेळून अथवा आफ्रिका दौऱ्यासाठी सराव करणं गरजेचं होतं.” बेदींनी भारताच्या पराभवावर आपलं परखड मत मांडलं.

अवश्य वाचा – रहाणेच्या गच्छंतीसाठी आग्रही असणारी माणसं आता त्याचं समर्थन करतायत, विराटचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर

याआधीही भारतीय संघ परदेशात पराभूत झाला आहे. त्यामुळे या पराभवाने खचून जाण्याची अजिबात गरज नाही. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. मात्र गलथान क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीतली हाराकिरी या गोष्टींमुळे भारतीय संघाची वाताहत झाली आहे. यातून भारतीय संघाला खूप गोष्टी शिकण्याची संधी आहे. या वर्षात भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. इथेही भारताला आफ्रिकेसारख्याच खेळपट्ट्या आणि वातावरणाचा सामना करावा लागेल. अशावेळी आफ्रिकेतला अनुभव चांगला कामाला येऊ शकतो, असं बेदी म्हणाले.

अवश्य वाचा – तुम्ही संघ निवडा आम्ही तो खेळवू; कोहली पत्रकारांवर संतापला

याचसोबत बिशनसिंह बेदींनी भारताच्या संघनिवडीवर कोणाचंही नाव न घेता टीका केली. भारतीय संघ निवडताना कसोटी क्रिकेटसाठी वन-डे सामन्यांतील कामगिरीचा निकष लावण्यात आलेला आहे असं वाटतं. अजिंक्य रहाणेऐवजी रोहित शर्माला चांगल्या कामगिरीच्या निकषावर संघात जागा देण्यात आली. मात्र ४ डावांमध्ये त्याला फक्त ७८ धावा करता आल्या. कर्णधाराने कोणता संघ निवडावा हे सांगणं माझं काम नाही. मात्र संघाचा उप-कर्णधार राखीव खेळाडूंमध्ये बसणं ही गोष्ट मी मान्य करु शकत नाही. बेदींनी नाव न घेता कोहलीच्या संघ निवडीवर नाराजी व्यक्त केली.

“दोन कसोटी सामन्यांत घडलेल्या या घडामोडी रहाणे सकारात्मक पद्धतीने घेईल याची शाश्वती नाही. तो देखील एक माणूसच आहे. जर त्याला संघाच्या बाहेर बसवायचच होतं, मग तुम्ही त्याला उप-कर्णधार कशाला बनवलंत?? कसोटी आणि वन-डे क्रिकेट हे दोन भिन्न प्रकार आहेत. वन-डे सामन्यातल्या कामगिरीचा निकष तुम्ही कसोटीसाठी संघ निवडताना लाऊ शकत नाही”, असं म्हणत बेदी यांनी भारतीय संघाचे कान टोचले.