अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय फलंदाजीचं मोठं आव्हान परतवून लावण्यात ऑस्ट्रेलियाला यश आलं आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यात १२ धावांनी बाजी मारत कांगारुंनी टी-२० मालिकेचा शेवट गोड केला आहे. १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने ८५ धावांची आक्रमक खेळी केली. परंतू दुसऱ्या बाजूने इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने भारताला पराभवाचा सामना करावा लागला. अखेरचा सामना भारताने गमावला असला तरीही टी-२० मालिकेत २-१ ने बाजी मारण्यात भारत यशस्वी ठरलाय.

मालिकेत आश्वासक खेळी करणाऱ्या हार्दिक पांड्याला मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. परंतू हार्दिकने मनाचा मोठेपणा दाखवत, पहिला आंतरराष्ट्रीय दौरा खेळणाऱ्या नटराजनचं कौतुक करत, ज्या परिस्थितीत तू भारतीय संघासाठी खेळी केली आहेस ते पाहता माझ्यासाठी तूच खरा मालिकावीर आहेस अशा शब्दांत त्याचं कौतुक केलंय.

वन-डे मालिकेत अखेरच्या सामन्यात नटराजनला भारतीय संघात संधी देण्यात आली. यानंतर टी-२० मालिकेतही तिन्ही सामन्यात नटराजनने आश्वासक मारा करत भारताला महत्वाचे बळी मिळवून दिले. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून आलेल्या नटराजनने युएईत पार पडलेला आयपीएलचा तेरावा हंगाम गाजवला. यासाठीच त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्थान देण्यात आलं. नटराजननेही आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करत स्वतःची निवड सिद्ध केली.