भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने इंदूर कसोटी सामन्यात डावाने विजय मिळवला आहे. एक डाव आणि १३० धावांनी विजय मिळवत भारताने बांगलादेशविरुद्ध मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना २२ नोव्हेंबरपासून कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर सुरु होणार आहे. भारतीय संघाचा हा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे.

बांगलादेशवर डावाने मिळवलेल्या विजयासोबतच कर्णधार विराट कोहलीने महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने विराटचा हा १० वा डावाने विजय ठरला आहे. धोनीने कर्णधार म्हणून ९ सामन्यांमध्ये डावाने विजय मिळवून दिला आहे.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत असताना बांगलादेशचा संघ केवळ १५० धावांवर गारद झाला. यानंतर मयांक अग्रवालचं द्विशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर भारताने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. भारताने आपला पहिला डाव ४९३ धावांवर घोषित केला.

अवश्य वाचा – IND vs BAN : दुसरा डाव शमीचा ! पटकावला दोन वर्षांत सर्वोत्तम गोलंदाज बनण्याचा बहुमान

प्रत्युत्तरादाखल बांगलादेशची दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली. मोहम्मद शमी, रविचंद्रन आश्विन, उमेश यादव आणि इशांत शर्मा यांनी टिच्चून मारा करत बांगलादेशची झुंज मोडून काढली. दुसऱ्या डावात बांगलादेशकडून मुश्फिकुर रहिमने ६४ धावांची खेळी केली, मात्र त्याची झुंज अपयशीच ठरली.