टी-२० मालिकेत बांगलादेशवर मात केल्यानंतर भारताने कसोटी मालिकेची सुरुवातही धडाकेबाज पद्धतीने केली आहे. इंदूर कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशवर १ डाव आणि १३० धावांनी मात करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. कर्णधार या नात्याने विराट कोहलीसाठी हा सामना अतिशय महत्वाचा ठरला आहे. कर्णधार या नात्याने सर्वाधिक डावाने विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत विराटने धोनीला मागे टाकलं आहे.

अवश्य वाचा – IND vs BAN : इंदूर कसोटीत भारताचा डावाने विजय ! कर्णधार विराटचा धोनीला धोबीपछाड

याचसोबत विराटने ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज कर्णधार अ‍ॅलन बॉर्डर यांच्या कामगिरीशी बरोबरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये विराटने बॉर्डर यांच्या ३२ विजयांच्या कामगिरीशी बरोबरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या कर्णधारांच्या यादीत विराट सध्या बॉर्डर यांच्यासह चौथ्या स्थानावर आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे कर्णधार –

  • ग्रॅम स्मिथ – दक्षिण आफ्रिका ( ५३ विजय)
  • रिकी पाँटींग – ऑस्ट्रेलिया (४८ विजय)
  • स्टिव्ह वॉ – ऑस्ट्रेलिया (४१ विजय)
  • विराट कोहली/अ‍ॅलन बॉर्डर (३२ विजय)

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत असताना बांगलादेशचा संघ केवळ १५० धावांवर गारद झाला. यानंतर मयांक अग्रवालचं द्विशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर भारताने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. भारताने आपला पहिला डाव ४९३ धावांवर घोषित केला.

अवश्य वाचा – ICC World Test Championship Points Table : भारतीय संघाचं गुणांचं त्रिशतक

प्रत्युत्तरादाखल बांगलादेशची दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली. मोहम्मद शमी, रविचंद्रन आश्विन, उमेश यादव आणि इशांत शर्मा यांनी टिच्चून मारा करत बांगलादेशची झुंज मोडून काढली. दुसऱ्या डावात बांगलादेशकडून मुश्फिकुर रहिमने ६४ धावांची खेळी केली, मात्र त्याची झुंज अपयशीच ठरली.

अवश्य वाचा – IND vs BAN : दुसरा डाव शमीचा ! पटकावला दोन वर्षांत सर्वोत्तम गोलंदाज बनण्याचा बहुमान