जेम्स मायकल अँडरसन. इंग्लंडचा असा वेगवान गोलंदाज, जो सातत्यानं वनडे नव्हे, टी-२० नव्हे तर चक्क कसोटी क्रिकेट खेळतोय. कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल १८ वर्षाचा अनुभव. वेगवान गोलंदाजांना दुखापतीचा शाप असतो, असं म्हणतात. पण हा शाप पूर्णपणे खरा नसल्याचा अँडरसननं सिद्ध करून दाखवलं. भारताचा कर्णधार विराट कोहली १५ वर्षांचा असताना अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं होतं. विराटनं जेव्हा आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, तेव्हा अँडरसनला ८ वर्षांचा अनुभव आला होता. इतकंच नव्हे, तर त्यानं ५० हून अधिक कसोटी आणि २००हून अधिक बळीही घेतले होते.

फक्त इंग्लंडच नव्हे, तर जगातील अनुभवी सक्रिय क्रिकेटपटूंमध्ये अँडरसन सर्वात उजवा ठरतो. सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्याचा पहिला क्रमांक लागतो. आज त्यानं नॉटिंगहॅमच्या पहिल्या कसोटीत भारताच्या डावाला सुरूंग लावत ४ बळी टिपले. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह हे फलंदाज त्याच्या जाळ्यात अडकले. विशेष म्हणजे, वय वर्ष ३९ असतानाही त्याची गोलंदाजी एखाद्या युवा वेगवान गोलंदाजाला लाजवेल, अशीच आहे. वेग, स्विंग, बाऊन्स या सर्व आखाड्यांवर अँडरसन आजही उत्तम आहे.

 

पहिल्या कसोटीत अँडरसननं विराटला शून्यावर माघारी धाडलं. त्यानं टाकलेला अप्रतिम चेंडू विराटच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. विराट-अँडरसनचं युद्ध नेहमीच पाहण्यासारखे असतं. मात्र या कसोटीच्या पहिल्या डावात अँडरसन विजयी ठरला. भारतीय फलंदाजांवर तो नेहमीच वर्चस्व गाजवताना दिसून आलाय.

हेही वाचा – सावळा गोंधळ..! काही तासांतच ट्विटरनं धोनीबाबतची ‘ती’ चूक सुधारली

अँडरसन आणि भारतीय फलंदाज

भारतीय फलंदाजांनांमध्ये अँडरसननं सर्वाधिक महान फलंदाज सचिन तेंडुलकरला बाद केलंय. त्यानं तब्बल १२ वेळा सचिनला माघारी धाडलंय. त्यानंतर धोनीचा क्रमांक लागतो. तो कसोटी क्रिकेटमध्ये १० वेळा बाद झाला होता. त्यानंतर आता विराट आणि गौतम गंभीर संयुक्तपणे तिसर्‍या स्थानी आहेत. अँडरसननं गंभीरला नऊ वेळा कसोटी क्रिकेटमध्ये बाद करण्याचा कारनामा केला होता.

 

आज अँडरसननं भारताचा महान फिरकीपटू अनिल कुंबळेला मागे टाकलं. कुंबळेनं कसोटी क्रिकेटमध्ये १३२ सामन्यांत ६१९ बळी घेतले होते. आता अँडरसनच्या नावावर ६२० बळी जमा झाले आहेत. पहिल्या डावात सर्वाधिक धावांची खेळी केलेल्या लोकेश राहुलला बाद करत अँडरसननं हा विक्रम आपल्या नावावर केलाय. एकंदरीत सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा महान गोलंदाज मुथय्या मुरलीधरन (१३३ कसोटीत ८०० बळी) आणि ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न (१४५ कसोटीत ७०८ बळी) यांच्या मागे आहे. कसोटीत ७०० बळी घेण्याच्या प्रयत्नात असल्याचेही अँडरसननं याआधी म्हटलं होतं. त्याच वय आणि ऊर्जा पाहता तो या स्वप्नाकडं नक्कीच यशस्वी वाटचाल करेल, अशी आशा सर्वांनी व्यक्त केलीय.